पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारखानदार दुःखी आहे. आपल्यातले तरुण व्यापार करायला शहरात जातात, ते काय सांगतात? ते म्हणतात, "व्यापार करणंसुद्धा तितकं सोपं नाही. तुम्ही पुढाऱ्यांशी संबंध ठेवले, पुढाऱ्याच्या छत्रीखाली असलात, तर तुम्हाला लायसेंस- परमिट मिळतं; एरव्ही, व्यापारी प्रामाणिकपणे काम करायला गेला, तर त्याचं आयुष्यसुद्धा फार कठीण आहे." डॉक्टर तेच म्हणतात, वकील तेच म्हणतात, उद्योजक तेच म्हणतात, लेखक तेच म्हणतात, कवी तेच म्हणतात, खेळाडू तेच म्हणतात.
 स्वातंत्र्यानंतर देश सुधारला असं कोणीच म्हणत नाही, तीन लोक सोडून. स्वातंत्र्यानंतर देश सुधारला असं म्हणणारे हे तीन लोक कोण?
 पहिला म्हणजे, पुढारी. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, १९४७ मध्ये पुढारी मंडळी खादीचे धुवट कपडे घालत होती आणि त्यांच्या चपलेला निदान तीन-चार ठिगळं लावलेली असायची आणि जर का जिल्ह्याच्या गावी जायचं, तर गावातल्या लोकांना वर्गणी जमवून, त्यांच्या प्रवासाची सोय करावी लागायची. असा पुढारी होता ४७ मध्ये; त्यागी, कष्ट करणारा, सेवा देणारा आणि आज ९५ सालचं चित्र काय ? पुढाऱ्याचं वजन निदान अर्ध्या टनाचं, पांढरे शुभ्र कपडे, कित्येक गाड्यांचा ताफा, त्यांच्यामागे लाचारांची फौज, जिल्ह्याच्या ठिकाणी किती बंगले, किती जमिनी, राज्याच्या राजधानीत किती आणि दिल्लीत किती ! पैशाचा हिशेब आता हजारांत नाही, लाखांत नाही, कोट्यवधी रुपयांत असतो. असा पुढारी खुश आहे. तो म्हणतो, समाजवाद चालू द्या, लायसेंस-परमिट राज चालू द्या, आमचं उखळ पांढरं होऊ द्या.
 दुसरा खुश नोकरदार. ४७ मध्ये म्हण होती 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी!' आता उत्तमच नव्हे तर नोकरी म्हणजे स्वर्गच आणि शेती म्हणजे नरकच. ४७ वर्षांपूर्वी मुलीचा बाप म्हणायचा, पंधरावीस एकरवाल्यांच्या घरी मुलगी दिली, तर सुखाने नांदेल; नोकरमान्या नको. आज काय स्थिती आहे? आता मुलीचा बाप पंचेवीस एकरांच्या मालकालासुद्धा मुलगी द्यायला तयार होत नाही; म्हणतो, "दुष्काळ पडला तर खडी फोडायला जायला लागेल पोरीला, त्यापेक्षा एसटी कंडक्टर जावई परवडला." ही सगळी नेहरूनीतीची कृपा.

 सत्तेचाळीस वर्षांच्या नेहरू अमलाने आणखी कोण खुश झाले? खुश झाले गुंड. राज्य चालू कुणाचं झालं ? 'दाऊद इब्राहिम', 'अरुण गवळी' आणि प्रत्येक जिल्ह्यातले गुंड नेहरूराज्यावर खुश आहेत.

पोशिंद्यांची लोकशाही / १००