पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'माझा नातू सोन्याच्या चमच्याने दूध पिताना पाहून दे.' म्हणजे एका वरात त्यानं काय काय मागितलं? लग्न झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, त्याचं लग्न होऊन त्याला मुलगा झाला पाहिजे, त्याला दूध पिताना पाहायचे म्हणजे धनसंपत्ती हवी आणि दृष्टीही असली पाहिजे. एका वरात किती गोष्टी मागितल्या !
 तसंच, नेहरूवादी समाजवादाच्या काळात आपण फक्त एकच गोष्ट, साधी गोष्ट मागितली. शेतीमालाचा भाव. भीक म्हणून नव्हे, हक्क म्हणून. कारण आम्हाला माहीत होतं, की शेतीमालाचा भाव शेतकऱ्यांना मिळाला म्हणजे समाजवादी नेहरूव्यवस्थेच्या गळ्याला हूक लागलाच, त्यानंतर ती व्यवस्था टिकूच शकत नव्हती. हे ती व्यवस्था चालवणारेही जाणून होते; म्हणूनच त्यांनी हर प्रयत्नाने शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला; पण शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना लुटून उभी राहिलेली ही समाजवादी नेहरूव्यवस्था टिकूच शकत नाही याची आम्हाला खात्री होती आणि आमचं म्हणणं आता खरं ठरलं आहे.
 आज आपल्यापुढे प्रश्न काय आहे ? सध्या चालू आहे ती निवडणूक आहे का ? मी तरी आज जे चाललं आहे त्याला निवडणूक म्हणायला तयार नाही. स्वातंत्र्यानंतर निवडणुकांच्या नावाने जे काही झालं, त्या निवडणुका नव्हत्या; मग ते काय होतं?
 विदर्भातले एक कवी विठ्ठल वाघ यांची एक फार प्रसिद्ध कविता आहे. जनता-गरीबगुरीब शेतकरी माणसं त्यांच्या कवितेत म्हणतात,
  'आमी मेंढरं मेंढरं, यावं त्यानं हाकलावं
  पाच वर्षांच्या बोलीनं, होतो आमचा लिलाव
 आतापर्यंत ज्या आठ निवडणुका झाल्या, त्या निवडणुका नव्हत्या, ते लिलाव होते; शेतकऱ्यांच्या भाग्याचे लिलाव. निवडून यायचं म्हणजे काय करायचं ? मुंबईला जायचं, दिल्लीला जायचं आणि शेतकऱ्यांना लुटायचा गुत्ता घ्यायचा. शेतकऱ्यांना, उद्योजकांना, कष्टकऱ्यांना लुटायचं कोणी, त्यांना लुटायच्या व्यवस्थेवर बसायचं कुणी याचा गुत्ता मिळविणारे लिलाव म्हणजे या निवडणुका झाल्या.

 आता या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अशी शक्यता तयार झाली, की लिलाव टाळून लोकांना खऱ्या अर्थानं स्वतंत्र होता येईल. गांधींच्या अंत:करणामध्ये ज्या स्वतंत्र देशाची कल्पना होती, तो स्वतंत्र भारत तयार

पोशिंद्यांची लोकशाही / ९७