पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फरकाने सर्वांत दीन पीडित स्त्रीच्या दृष्टिकोनातून विकासाचा कार्यक्रम तपासला गेला पाहिजे, असे हे नवे सूत्र आहे.
 या सूत्राचा व्यवहारात काय अर्थ लागतो?
 उदा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घ्या. स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षांनी लाखो गावांना आज पिण्याचे पाणी नाही. डोक्यावर हंड्यांच्या उतरंडी वाहत मैलच्या मैल बाया दिवसामागून दिवस पाणी भरत आहेत.
 पाण्याचे नियोजन करणारी मंडळी, त्यांना कधी अशी उतरंड उचलावी लागली नाही. त्यांना पाणी वाहणाऱ्या स्त्रीच्या काबाडकष्टांचे काय? त्यांच्या योजना भव्य दिव्य. धरणे, कालवे, तळी, टाक्या, नोकरशहांच्या फायद्याच्या, कंत्राटदारांच्या लाभाच्या आणि पुढाऱ्यांच्या सोयीच्या. पाण्याच्या नियोजनाचे काम पाणी वाहणाऱ्या एखाद्या बाईकडे असते, तर ती म्हणाली असती, "गावांत एवढ्या उंच खर्चीक टाक्या बांधायची काय गरज आहे. जेथून बाया पाणी भरतात तिथून मोटर इंजिन लावा, गावांतल्या दोनचार नळांच्या कोंडाळ्यांना तास दोन तास पाणी आले म्हणजे बायांच्या डोळ्यांतलं पाणी खळेल. बस. बाकीच्या बांधकामांची काही घाई नाही."
 स्त्रियांचा दृष्टिकोन असा अनेक बाबतीत वेगळा असू शकतो.
 प्राथमिक आरोग्य केंद्रात बाईला आणतात, आणली तर, बाळंतपणासाठी किंवा अगदीच मरणासन्न झाली म्हणजे. काय उपयोग बाईमाणसांना तिथल्या डॉक्टरांचा आणि बाकी सर्व साधनांचा ? त्यांच्यापेक्षा गावांतील सुईण थोडे प्रशिक्षण देऊन अधिक कुशल केली असती, तर बायांना केवढा आधार झाला असता !
 मुलींना आधीच शाळेत पाठवायला शेतकरी आईबाप तयार नसतात. गावात जितकी शाळा असेल, तितकी पुरी झाली असेल तरी मोठी नवलाची गोष्ट. गावाची शाळा संपली म्हणजे दूरच्या गावी पुढच्या शिक्षणासाठी मुलांना पाठवतात. मुलींना क्वचितच. गावाच्या छोट्याशा शाळेत गुरुजी येतातच. त्यांच्याकडून मुलींच्या शिकवण्याची सोय गावातल्या गावात सहज करता येईल.
 ...पण लक्षात कोण घेतो?

 महिलांच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधून घ्यावे, स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा मान मिळवून द्यावा, हेच शेतकरी महिला आघाडीचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच शेतकरी महिला आघाडी महिलांच्या राखीव जागा लढवत आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ९०