पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागले आहेत. सुदैवाने न्यायव्यवस्थेचे काही निर्णय आणि शेतकरी संघटनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले अर्ज याचा काहीसा परिणाम या पक्षांच्या प्रचारावर झाला आहे.
 शिवसेनेचे बाळ ठाकरे अजूनही काही ऐतिहासिक नाटकांतील वीरश्रीपूर्ण भाषणांप्रमाणे भाषणे करतात; पण बाकीचे नेते दबून दबूनच बोलत आहेत. निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीमुळे शिवसेनेच्या खोकडाची शेपटी बरोबर सापळ्यात अडकल्यासारखी झाली आहे.
 येत्या तीन दिवसांत प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल आणि त्यानंतर आठवड्याभरात निवडणुकीचे निर्णय हाती येतील. तोपर्यंत सर्व काही, फार रक्तपात न होता, पार पडो अशी इच्छा. सर्वांनी मते द्यावीत, निर्भयपणे द्यावीत. आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवारास द्यावीत. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा आणू नये. सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पुण्याच्या शेतकरी पंचायतीने जाहीर केलेला सत्याग्रहाचा कार्यक्रमसुद्धा स्थगित ठेवण्यात आला आहे. देश घायाळ झालेला आहे; पण इतिहासात अनेक वेळा अशा प्रसंगी महात्मे उदयास आणण्याचे सामर्थ्य या देशाने दाखविले आहे. हे पुन्हा घडेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. तोपर्यंत, आज तातडीने या निवडणुकांच्या काळात एकच खबरदारी आपण घेऊ शकतो. देशाच्या जखमा बऱ्या करणारा धन्वंतरी येईपर्यंत जखमांमध्ये जातीयवादाच्या जंतूंचा शिरकाव होणार नाही एवढी खबरदारी प्रत्येक मतदाराने घेतली पाहिजे. काही नाही तरी, जातीयवादाला दूर ठेवण्याइतकी सुबुद्धता भारतातील मतदारांत आणि विशेषतः शेतकरी समाजात आहे असे सिद्ध झाले तर संकट टळेल आणि विकासाची वाट मोकळी झाली असे होईल.

(६ नोव्हेंबर १९९४)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / ८३