पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थिरतेचे आकर्षण दाखवून, पुन्हा एकदा गटविणे हा इंदिरा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मध्यवर्ती कार्यक्रम.
 राष्ट्रीय मोर्चाचे स्वरूपच गेल्या आठनऊ महिन्यांत बदलून गेले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधी आघाडी म्हणून राष्ट्रीय मोर्चाचा उदय झाला. ग्रामीण भारतातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारी ही आघाडी सत्तेवर आली आणि राष्ट्रीय मोर्चाचे स्वरूप बदलून गेले. मागासवर्गावर आणि जातींवर सहस्रावधी वर्षे प्रचंड अन्याय झाले. यात काहीच वाद नाही. समाजाने लादलेले मागसलेपण दूर करण्याकरिता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, यातही काही शंका नाही; पण जातिव्यवस्थेचा महाराक्षस गाडण्याकरिता जातीयवादाचाच झेंडा उभारण्याचा मार्ग राष्ट्रीय मोर्चाने स्वीकारला. देशाच्या विकासाची गती आणि गुणवत्ता अशी असू शकते, की ज्यामुळे पिढ्यान् पिढ्या रुजलेली जातीयता संपूनच जाईल; पण अशा पुरुषार्थाची महत्त्वाकांक्षा राष्ट्रीय मोर्चात राहिलेली नाही. नोकऱ्यांच्या भुलावणीने मागासवर्गाची गठ्ठा मते घेण्यातच त्यांना आज धन्यता वाटत आहे. मंडल आयोगाच्या अहवालाला मार्क्सच्या कॅपिटल सारग्रंथापेक्षाही जास्त महत्त्व असल्यासारखे बोलत आहेत, केवळ राष्ट्रीय मोर्चाचे नेतेच नव्हेत, तर डावे-उजवे कम्युनिस्ट पक्षसुद्धा!
 देशापुढच्या जटिल आणि घोरगंभीर समस्या सोडविण्याची कोणाही पक्षात ताकद नाही. इच्छाही नाही. त्यामुळे कसबी जादूगाराप्रमाणे लोकांची नजर दूसरीकडे वळवून, हातचलाखी करण्याची सर्वच पक्षांची हुन्नर चालू आहे.

 या सगळ्या धडपडीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसारखे, मुळात आर्थिक कार्यक्रम किंवा दृष्टिकोनच नसलेले पक्ष मागे थोडेच राहणार आहेत? राममंदिराच्या एका प्रश्नाने, १९८४ मध्ये संपुष्टात आलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष एकदम राष्ट्रीय महत्त्वाचा ठरला आणि आता सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहू लागला. शिवसेनेचे उद्दिष्ट मर्यादित आहे. मुंबईतील भूखंड आणि तस्करी म्हणजे सोन्याची खाण आहे ! त्या खाणीवर ताबा मिळविण्याकरिता मते पाहिजेत. मते मिळविण्याकरिता आज मराठी तरुणांना भडकवा, उद्या हिंदू माथेफिरूपणाला आवाहन करा, हा शिवसेनेचा कार्यक्रम राहिला आहे. या जातीयवाद्यांनी सर्वच नियम धाब्यावर बसवले आणि सत्ता जणू आता आपल्या हाती येणार आहे, अशा कैफात ते बोलू

पोशिंद्यांची लोकशाही / ८२