पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ४० वर्षे देशाच्या अधःपतनास जबाबदार असलेली काँग्रेस सगळ्या दोषांचे खापर दोनचार वर्षेच सत्ता हाताळलेल्या विरोधी पक्षांवर टाकू पाहत आहे. बिकट आर्थिक परिस्थितीस आणि राजकीय परिस्थितीस तोडगा काढणे आपल्यालाही शक्य नाही, हे काँग्रेस नेत्यांनाही माहीत आहे. किंबहुना, पंजाब काय, काश्मीर काय, आसाम काय या सर्व समस्यांचा जनकच काँग्रेस पक्ष. देशातील बेकारी, महागाई, चलनवृद्धी, भ्रष्टाचार, कर्जबाजारीपणा हे पातक कोणाचे ? खरे म्हटले तर इंदिरा काँग्रेस शहाजोगपणाचा आव आणून, हे प्रश्न सोडवू न शकण्याचा दावा करते, हे हास्यास्पद आहे आणि लोक असे दावे ऐकून घेतात, हे चित्र एकाच वेळी करुण आणि विनोदी आहे.
 मग, लोकांना आकर्षित करण्यासाठी इंदिरा काँग्रेस पक्षाकडे कार्यक्रम कोणता ? सगळी काही घोषवाक्ये वापरून झाली. 'गरिबी हटाव' या घोषावर एक निवडणूक जिंकली. त्यानंतर गरिबी वाढतच गेली. 'राष्ट्रीय एकात्मते'वर दुसरी निवडणूक जिंकली. त्यानंतर देशाच्या चिरफळ्या पडल्या. 'काम करणारं शासन' म्हणून आरोळी ठोकून तिसरी निवडणूक जिंकली आणि सर्व शासनच ठप्प झाले. आता देण्यासारखे घोषवाक्य एकच राहिले. इंदिरा काँग्रेस स्थैर्य देऊ शकते. कारण, पक्ष घराणेशाहीला बांधलेला आहे. निदान, पंतप्रधान कोणी व्हावे याबद्दल तरी या पक्षात वाद नाही. जनतेने पुरेसे बहुमत काँग्रेसच्या पदरात टाकले, तर पंतप्रधानांची खुर्ची स्थिर राहील यात बरेचसे तथ्य आहे; पण एक पंतप्रधानांची खुर्ची सोडली तर स्थिर काहीच राहत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ नाही, मुख्यमंत्री तर त्याहूनही नाही. पुण्यातील इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या जाहिरातीत एक व्यंगचित्र वापरले आहे. एक मध्यमवयीन जोडपे. त्यातील पत्नी म्हणते, 'आपले तरी कुठे पटत होते ? पंधरा वर्षे आपण केलाच ना संसार ? विरोधी पक्षाच्या लोकांना एवढेसुद्धा जमत नाही.' थोडक्यात, सुखी, संपन्न, कृतकृत्य करणाऱ्या संसाराची आता आशासुद्धा राहिली नाही. देवाने गाठी बांधल्या आहेत, मग एक दिवस मरण येईपर्यंत संसार कसाबसा निभावून न्यायचा आहे, हीच आता सर्वोच्च आकांक्षा!

 भारतात तसा स्थिरतेचा तुटवडा कधी पडला नाही. इंग्रजांनी, काठीला सोने बांधून काशीपर्यंत बिनधास्त जाता येईल अशी व्यवस्था केली, तेव्हापासून इंग्रजांच्या राज्यात अगदी छान स्थिरताच होती ! स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या ४० वर्षांच्या राज्यात दोन पंतप्रधान अगदी यमुनाकाठी नेईपर्यंत

पोशिंद्यांची लोकशाही / ८०