पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अपात्र नेत्यांनी मांडलेली जनतेची अग्निपरीक्षा
(लोकसभा निवडणूक १९९१)


 १९९१ सालची लोकसभेची मध्यावधी निवडणूक आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळीच दिसते आहे.
 निवडणूक प्रचारासाठी साधारणतः तीन आठवड्यांचा अवधी मिळतो. सर्वच पक्ष आणि सगळेच उमेदवार या तीन आठवड्यांतल्या दिवसान् दिवसाचा, प्रत्येक तासाचा, अगदी मिनिटाचासुद्धा दिवस रात्र न पाहता; थंडी, वारा, ऊस, पाऊस यांना न जुमानता, मतदारांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नासाठी वापर करण्यास धडपडतात. यंदाच्या निवडणूक प्रचारात असा उत्साह उमेदवारांतही दिसत नाही आणि मतदार जनतेत तर त्याहूनही नाही.
 जास्तीत जास्त भर महागड्या प्रचंड फलकांवर, झेंडे आणि कापडी फलकांच्या वापरावर आणि श्राव्य व दृक्श्राव्य कॅसेटवर आहे. सर्व पक्षांचे राष्ट्रीय नेते विमानाचा वापर करून, इकडेतिकडे धावत आहेत. त्यांच्या भाषणांना दहावीस हजारांवर माणसे कोठेच जमत नाहीत. अनेकांच्या सभांना तर काही ठिकाणी दोनपाचशे माणसे जमा करणेसुद्धा मुश्किल झाले आहे.

 औटघटकेचे पंतप्रधान चंद्रशेखर यांना आपल्याला भवितव्य नाही, याची स्पष्ट कल्पना येऊन गेली आहे. त्यांच्या आसपास अगदी किमान गुणवत्तेचासुद्धा एकही माणूस नाही; पण चंद्रशेखर यांची पंतप्रधान म्हणून स्वतःची प्रतिमा मात्र चांगली उजळ राहिली आहे. चंद्रशेखरांच्या हाती जमेची बाजू त्यांची व्यक्तिगत प्रतिमा एवढीच आहे. 'सर्वांत गचाळ पक्षाचे सर्वोत्तम नेते,' असे एका व्यंगचित्रकाराने त्यांचे वर्णन केले आहे. त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेतून काही चमत्कार घडवून आणता येईल अशा आशेने त्यांची धडपड चालू आहे. काळजीवाहू शासनाने धोरणात्मक बदल काही

पोशिंद्यांची लोकशाही / ७८