पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोलकत्त्यातील रस्त्यांत त्यांनी एकमेकांचे जितके रक्ताचे पाट वाहवले तितके साऱ्या नक्षलवादी चळवळीत वर्गशत्रूचेसुद्धा वाहवले नाहीत. जनता दलाच्या काळात सुब्रह्मण्यम स्वामी व्ही. पी. सिंगांवर मोठे नाराज झाले. माझ्यासमक्ष ते म्हणाले होते, 'काँग्रेस शत्रू खरा, राजीव गांधीला सत्तेवर पुन्हा येऊ देता कामा नये, हे खरे; पण पहिल्यांदा विश्वनाथ प्रताप सिंगांना संपले पाहिजे. इतका सुशिक्षित, सुसंस्कृत माणूस; पण अतिअभद्र शब्दांचा वापर करत त्यांनी जाहीर केले, 'विश्वनाथ प्रताप सिंगांना संपवल्याखेरीज माझ्या आत्म्याला समाधान वाटणार नाही.' विरोधकांना काँग्रेस विरोधापेक्षा आपापसांतील विरोध अधिक भयानक वाटतात. या उलट, काँग्रेसवाले मात्र सत्तेबाहेर राहण्यापेक्षा अगदी किरकोळ जागीपण सत्तेशी जोडून राहावे अशा चातुर्याचे. काँग्रेसच्या ताकदीचे हे एक रहस्य आहे.
 काँग्रेसची तुलना हिंदू धर्माशी करता येईल. हिंदू धर्माची व्याख्या कोण करू शकेल ? नरबळी देणारेही हिंदू आणि कोणाही प्राणिमात्राच्या हिंसेच्या केवळ कल्पनेने कासावीस होणारेही हिंदू. हिंदू धर्माने माणसाला जितके नीच केले, त्यावर अन्याय केले तितके दुसऱ्या कोणत्याच संस्थेने केले नाही. हिंदू धर्मीयांच्या इतिहासात जागोजागी पराभव झाला आणि तरीही आज 'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती,' तसा हिंदू धर्मही टिकून आहे. काँग्रेसही टिकून आहे.

 या सर्वांहूनही काँग्रेसची ताकद ऐतिहासिक वडीलकीत आहे; इंग्रज आल्यानंतर स्थापन झालेला पहिला पक्ष. त्यानंतर काही थोडेथोडके पक्ष तयार झाले काय ? पण जहालवादी लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये जाऊन सूरतच्या अधिवेशनात दंगल पाहायला तयार झाले; पण त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला नाही. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले, त्यांनीही काँग्रेसचाच आधार घेतला. बूट-पाटलोणवाल्या काँग्रेसला पंचा नेसणाऱ्या महात्म्याने नखशिखान्त बदलून टाकले. या इतिहासामुळे काँग्रेसचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. बहुसंख्य निरक्षर लोक, वाहतुकीची साधने दुर्मिळ, संचार-व्यवस्था कठीण अशा देशात दुसरा कोणता पक्ष निघाला, तर त्याचं नाव सर्व देशभर पसरण्याच्या आधी निवडणुकीत त्याचा निःपात होऊन, निकालसुद्धा लागून जातो. देशाचा प्रचंड विस्तार, लोकांची निरक्षरता आणि आर्थिक दारिद्र्य; यांमुळे तुकडे-तुकडे झालेल्या देशात केवळ ऐतिहासिक वडीलकीच्या आधारावर काँग्रेस बाजी मारून जाते.

पोशिंद्यांची लोकशाही / ७०