पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजत नाही. काँग्रेस जिंकते म्हणजे नेमके कोण जिंकते? महाराष्ट्रात सहकारी चळवळीतून पुढे झालेले धनदांडगे, शहरातील बांधकाम व्यावसायिक, लायसेंस-परमिट राज्यात चोरीमारी, तस्करी करणारे, हातभट्टी चालवणारे, सरकारी योजनांचा लाभ लाटणारे अशा अनेकांची युती काँग्रेसच्या झेंड्याखाली झाली आहे; पण हे विधानही तसे सगळ्या महाराष्ट्राला लागू नाही. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसवर ताबा असणाऱ्या गटाचे स्वरूप एकसारखे आहे, असे मुळीच नाही. मुंबईतील काँग्रेसवाला वेगळा, चंद्रपूरमधील वेगळा, रत्नागिरी जिल्ह्यातील त्याहूनही वेगळा. केरळ राज्यात काँग्रेस मुसलमानांना जी आश्वासने देते त्याच्या नेमकी उलटी ईशान्येतील राज्यांत देते. काँग्रेस शहरांत वेगळी, गावांत वेगळी. काँग्रेसचा रंग काय? पाण्याचा रंग काय ? ज्यात मिळवाल तो पाण्याचा रंग. विचार नसणे, दिशा नसणे आणि परिस्थितीप्रमाणे सत्ता काबीज करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणे हे काँग्रेसचे मोठे सामर्थ्य आहे.
 दक्षिण महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेसला आर्थिक ताकद पुरवतात. मध्य प्रदेश, बिहारच्या मागास भागात सरकारी कंत्राटदार काँग्रेसचे मोठे समर्थक आहेत. मुंबईत कारखानदार काँग्रेसला खूष ठेवू पाहतात, गुजराथेत व्यापारी, तर हरियानामध्ये जाट शेतकरी; पण असा एकही प्रदेश नाही, की जेथे काँग्रेसच्या मागे आर्थिक प्रबळ सामर्थ्य नाही. याउलट, विरोधी पक्ष निवडणुकीपुरते निधी जेमतेम जमा करतात; पण काही कायमस्वरूपी आर्थिक संस्था विरोधकांच्या मागे असल्याचे उदाहरण कोठेच नाही.

 काँग्रेसवाले एकमेकांना सांभाळून घेतात. एकमेकांत शंभर आणि पाच; पण दुसऱ्याशी विरोध करण्याचा प्रसंग आला तर मात्र एकशेपाच अशी एकी व्यवहारचतुर माणसांत सापडते. काही पदरी पाडून घेण्याकरिता निघालेली माणसे असा समजूतदारपणा दाखवतात. गाडगीळ शंकरराव चव्हाण, शरद पवारांवर काय वाटेल ते तोंड सोडोत आणि शरद पवार खासगीत नरसिंह राव यांच्याविरुद्ध काहीही बोलोत; पण शेवटी आपल्याबरोबर सगळा पक्ष खाली नेण्याची चरणसिंगी आणि देवीलाली खेळी ते कधीच खेळत नाहीत. याउलट, विरोधकांचे आहे त्यांचे एकमेकांत फाटले, की काँग्रेसपेक्षा आपला जुना साथीदार त्यांना अधिक भयानक शत्रू वाटू लागतो. कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी यांत वितंड माजले, तर

पोशिंद्यांची लोकशाही / ६९