पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसाची गुणवत्ता सुधारण्याचे महात्म्यांनी सांगितलेले मार्ग निसर्गाला रुचत नाहीत असे दिसते. श्रेष्ठत्व आणि गुणवत्ता म्हणजे काही एक ठराविक प्रकारची भूमिका हे निसर्गाला मान्य नाही. मनुष्य अनुभवसंपन्न आणि परिपूर्ण असावा. ठोकळेबाज पुरुषार्थाच्या कल्पना निसर्गाला मान्य नाहीत. सत्तेची दुष्टता टाळण्याचे गुणात्मक उपाय सारे फसले. सत्तेची दुष्टता संपवण्याचा एकच मार्ग म्हणजे सत्ताकेंद्राची विविधता आणि त्यांच्यातील स्पर्धा. सत्ताकेंद्र म्हणजे काही फक्त राजधानीतील केंद्र नाही. प्रत्येक माणूस आपापल्या जागी, आपापल्या काळी काही प्रमाणाततरी सत्ता गाजवतच असतो. कोणाचीही सत्ता निरंकुश नको, त्याला स्पर्धा पाहिजे, तरच दुष्टता आटोक्यात राहण्याची काही आशा.
 स्पर्धा
 ६ : स्पर्धा ही जगातील चैतन्याचे रहस्य आहे. ती काही फक्त बलदंडांची टक्कर नाही. स्पर्धा हा प्रशिक्षणाचा सगळ्यांत प्रभावी आराखडा आहे. स्पर्धेत उतरल्याने स्पर्धा करण्याची शक्ती वाढते; जसे, पाण्यात उतरल्याने पोहता येते, मूल पडतापडता चालायला शिकते.
 जोपासना दुर्बलांसाठी
 ७ : याउलट संरक्षणाने देणाऱ्याचे भले होत नाही, ना घेणाऱ्याचे. व्यक्तींच्या विविधतेत काही दुर्बल घटक असणारच. लहान मुले, मतिमंद, दुर्बल, अपंग हेदेखील समाजाचे घटकच आहेत. स्पर्धेशिवाय दुर्बलांच्या जोपासनेचे सूत्रही महत्त्वाचे आहे; पण जोपासणी अपंगपणा वाढवणारी, विकासाची इच्छा खुंटवणारी नको. हातपाय नसलेल्यांना जागतिक खेळांच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही; पण त्यांची त्यांची स्वतंत्र खेळांची स्पर्धा असू शकते. लंगडे आणि सुदृढ यांचे सगळ्यांचे मिळून एकत्रच खेळ झाले पाहिजेत, असा कोणी आग्रह धरला, तर ते कोणाच्याच भल्याचे नाही; ना सुदृढांच्या, ना अपंगांच्या.
 व्यक्तिविकास हाच समाजविकास

 ८ : व्यक्तीच्या विकासाच्या धडपडीतून समाजाचा, राष्ट्राचा विकास होतो, विकास कोठे थटला असेल तर समजावे, व्यक्तीच्या विकासाच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी कोठेतरी बंधन घातले आहे. विकास निसर्गसिद्ध आहे, गरिबी निसर्गविपरीत आहे. व्यक्ती आणि विश्वाच्या एकात्मतेला तडा देऊ पाहणाऱ्यांनी गरिबी तयार केली आहे. गरिबांच्या छातीवरून उठणे यासारखा परिणामकारक 'गरिबी हटाव' कार्यक्रम नाही.

पोशिंद्यांची लोकशाही / ५९