पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि जागाही नाही; पण जगातील उलथापालथींचे निष्कर्ष काय, हे थोडक्यात सारांशाने मांडले पाहिजे.
 १ : अब्राहम लिंकनच्या काळापासून 'सर्व मानवप्राणी समान जन्माला आला आहे,' या फ्रेंच राज्यक्रांतीतील तत्त्वाला मान्यता मिळाली. विषमता निर्मूलनाच्या कार्यक्रमात 'माणसे समान आहेत,' म्हणजे एकसारखीच आहेत असे मानले गेले आणि माणसाकडे व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी समाजाच्या अनेक घटकांपैकी एक हे स्थान त्याला मिळाले. व्यक्ती हरपली, गर्दीत दडपली गेली. समानतेचे तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीच्या पहिल्या तत्त्वाचे शत्रू बनले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीतील स्वातंत्र्य आणि समता यांच्या क्रमाची उलटापालट झाली. स्वातंत्र्यापेक्षा समता महत्त्वाची ठरली. ही ऐतिहासिक चूक आता सुधारली जाणार आहे. माणसे समान आहेत हे खरे; पण त्याचा अर्थ 'ती एका मुशीतली, एकसारखी बाहुली आहेत,' असे नव्हे. एका माणसासारखा हुबेहूब दुसरा कोणी असतच नाही; अगदी जुळेभाऊसुद्धा नाहीत. प्रत्येक मनुष्य त्याच्या स्थलकालात अनन्यसाधारण असतो. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते, म्हणून मनुष्यप्राणी समान असतो. व्यक्तीची अनन्यसाधारणता हा समानतेचा पाया आहे.
 कशासाठी जगणे
 २ : प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणिवांचे आणि अनुभवांचे विश्व व्यापक करण्याच्या धडपडीत असते. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी, प्रत्येक निवडीच्या वेळी जास्तीत जास्त विकल्प हात जोडून हजर असावेत आणि ते विकल्पही विविध पठडीतले असावेत, यासाठी मनुष्यप्राण्याची धडपड चालू असते. माणसाचा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा आहे; सुखाचा नाही, शांतीचा नाही, समाधानाचा नाही, सत्याचा नाही, शिवाचा नाही, सुंदराचा नाही, संपत्तीचा नाही, सत्तेचा नाही, दुःखीजनांच्या सेवेचा नाही आणि मोक्षाचाही नाही. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचे हे वेगळे वेगळे प्रकार आहेत.
 स्वार्थ हेच उद्दिष्ट

 ३ : अनन्यसाधारण व्यक्तीची चालायची वाट रुळलेली नाही, मार्गदर्शक कोणी नाही, त्याच्या प्रेरणा हाच त्याच्या हातातील दिवा. प्रमुख प्रेरणा अहंकाराची. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला सारे जग, ही जाणीव मुळी त्याच्या

पोशिंद्यांची लोकशाही / ५७