पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हटले होते, "माझ्या राजीनाम्याने आर्थिक सुधारांच्या कार्यक्रमावर काहीही विपरीत परिणाम घडणार नाही, कारण कार्यक्रमाचे खरे सूत्रधार पंतप्रधान स्वतः आहेत."
 वित्तमंत्र्यांच्या या विधानाची सचोटी आता स्पष्ट होत आहे. आर्थिक सुधारणा महत्त्वाची खरी; पण नोकरदारांची ऐष चालू ठेवणे हे त्याहूनही महत्त्वाचे. ही पंतप्रधानांची आर्थिक नीती आहे. १५,४०० कोटी रुपये एकूण सरकारी खर्चापैकी ७८,००० कोटी रुपये प्रशासकीय खर्चात जातात, २१,००० कोटी रुपये सबसिडीत जातात आणि कर्जावरील व्याजापोटी ३४,००० कोटी रु. जातात. असली अंदाधुंद परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर सबसिडी आणि नोकरदारांवरील खर्च निदान निम्म्याने कमी करण्याची गरज आहे. ती पुरी करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामर्थ्य असणारे सरकार दिल्लीत आले पाहिजे. अन्यथा, घसरणीला लागलेला देश विनाशापर्यंत पोचेल हे निश्चित. सारे विरोधी पक्ष या भाववाढीविरुद्ध ओरड करीत आहेत, आंदोलन करण्याची भाषा करीत आहेत. सत्य परिस्थिती अशी आहे, की सध्याच्या राजकीय पक्षांपैकी कोणताही सत्तेवर आला, तरी त्याला दुसरा काही पर्याय असणार नाही. कारण सरकारी खर्च कमी करण्याची कोणत्याही पक्षाची इच्छा नाही.
 दारुडे सरकार
 सरकारची स्थिती दारुड्या नवऱ्यासारखी झाली आहे. बायकोचे दागिने, अगदी मंगळसूत्रसुद्धा काढून घेऊन, आपले व्यसन पुरे करणे त्याला महत्त्वाचे वाटते. सरकारी अंदाधुंद खर्च चालविण्यासाठी गॅस, अन्नधान्य आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावरील भाववाढ करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत रेल्वे, टेलिफोन, टपाल यांच्यात भाववाढ होईल हे जवळजवळ नक्कीच आहे. लोकांनी निमूटपणे ही भाववाढ मान्य केली तर काय होईल ? नोकरशाही आणखी फोफावेल. उद्योजक आणि निर्यातदार यांच्या मार्गात अधिक अडचणी निर्माण होतील. परिणामी, देश अधिक संकटात सापडेल आणि समाजवादी रशियाच्या घसरगुंडीवर नेहरूवादी भारतही घरंगळत जाईल.

 नोकरदारांवरील आणि सरकारी उधळपट्टीवरील खर्च तडाख्यात कमी करण्यांत आला नाही, तर सरकारला मिळणारा प्रत्येक पैसा देशाला विनाशाकडे नेणारा ठरेल. 'दारुड्या' शासनाला एक पैसाही देणे म्हणजे देशाचा घात करणे आहे. देशाला विनाशाकडे नेणे आहे. सर्व देशातील आम जनतेने राव सरकारची 'नशाबाजी' बंद करण्याचा निश्चय केला पाहिजे. त्यात यश येणे कठीण आहे

पोशिंद्यांची लोकशाही / ५४