पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विश्वास असणाऱ्या जुन्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिगण निघून गेले आहेत किंवा त्यांना काढून टाकण्यात आले आहे. येल्त्सिन स्वतः कधी कधी खुल्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा निर्धार जाहीर करतात, तर कधी धीम्या गतीने वाटचाल करण्याची भाषा करतात. रशियाच्या नवीन राजमुद्रेवर दोन तोंडांच्या गरुडाचे चिन्ह आहे. या गरुडाप्रमाणे रशियन अध्यक्ष दुतोंडे झालेले आहेत अशी टीकाकारांनी मल्लिनाथी केली आहे.
 चारतोंड्या सिंह
 रशियन राजमुद्रेवरील गरुडाला दोन तोंडे आहेत; तर हिंदुस्थानच्या राजमुद्रेतील सिंहास चार तोंडे आहेत. त्यामुळे पंतप्रधान आणि वित्तमंत्री तीनचार वेगवेगळी मते वेगवेगळ्या वेळी आणि स्थळी मांडत असतात. ते सुधारणांचे श्रेयही घेतात, नेहरूंचा उदो उदोही करतात, लायसेन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज चालूही ठेवतात.
 गेल्या महिन्यापर्यंत सुधारांचा गाडा बरा चालला होता. निदान तो मोडून पडला नव्हता, एवढे तरी सर्वमान्य होते. सूर्याच्या सांकेतिक रथाचे वर्णन आहे:
 "रथाला चाक एक, घोडी सात, लगाम सापांचा, रस्ता अधांतरी, सारथी बिनपायाचा."
 डॉ. मनमोहन सिंगांच्या गाड्याची परिस्थिती इतकीच बिकट राहिली आहे. देश आर्थिक संकटात सापडलेला, नेतृत्व देण्यासाठी काँग्रेसखेरीज पक्ष नाही, त्या पक्षात सिंग साहेबांना स्थान नाही. पुढारी आणि नोकरदार यांनी सरकारचाच नव्हे तर, सगळ्या देशाचा गळा आवळलेला. बेकारी, महागाई, गुंडशाही, जातिवाद यांनी सगळा समाज ग्रासलेला. राज्यकर्त्या पक्षाचे बहुमत तुटपुंजे आणि तरीही मनमोहन सिंगांनी रथ बरा हाकला. नव्याने जुगार खेळणाऱ्या माणसाला सुरवाती सुरवातीस चांगला लाभ होतो म्हणतात. जन्मभर नेहरूव्यवस्थेच्या सेवेत काढल्यानंतर खुल्या व्यवस्थेच्या दरबारात हजर झालेल्या वित्तमंत्र्यांचे नशीब सुरवातीला तरी जोरावर दिसते. महागाई वाढण्याची गती आटोक्यात आली. परकीय चलनाची गंगाजळी झपाट्याने सुधारली; सहा महिन्यांच्या आयातीच्या रकमेइतकी ती बाळसेदार झाली आहे; पण खरी कसोटी पुढेच आहे.

 अंदाजपत्रकातील तूट कमी करण्यात फारसे यश लाभले नव्हते. यंदाच्या वर्षी अंदाजपत्रकी तूट राष्ट्रीय उत्पादनाच्या ४% पर्यंत खाली आणता आली, तर मनमोहन सिंगांनी आणखी एक फेरी जिंकली असे झाले असते. वित्तमंत्र्यांची आणि खुली अर्थव्यवस्था राबवण्याच्या कार्यक्रमाची खरी कसोटी इथेच होती. या कसोटीत ते सपशेल अपेशी झाले. तूट ८% पेक्षा जास्त राहील असे स्पष्ट

पोशिंद्यांची लोकशाही / ५१