पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काँग्रेसमध्येच राहणे अशक्य झाले तर महाराष्ट्राचे 'मुलामयसिंग' आपणच बनू, दलित आणि मागासवर्गीयांचा भरघोस पाठिंबा नामांतराच्या पुण्याईवर मिळाला तर इतर समाजातील काही मते गमावली, तरी बिगर काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात बस्तान बसविण्याचीही तयारी चालू आहे. मुलायमसिंग आणि कांशीराम जोडीची व्यूहरचना करणारे चंद्रशेखर बारामतीला येऊन गेले आणि दोनतीन दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते राहिले याचे इंगित हे आहे.
 काँग्रेसमध्ये राहिलो तर पंतप्रधान, न राहिलो तर, गेलाबाजार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा डावपेचाकरिता शरद पवार नामांतराचा जुगार खेळले. तो त्यांच्या अंगावर उलटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत जातीय दंगली झाल्या तेव्हा संरक्षणमंत्री असलेले शरद पवार मुंबईत तळ ठोकून बसले आणि पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करू लागले. आज मराठवाडा पेटला आहे, पण तेच शरद पवार स्वतः मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय खेळांच्या आसपास घिरट्या घालत आहेत, मराठवाड्यात फिरकले नाहीत. याचा फायदा शिवसेनेला मिळणार आहे. मध्यावधी निवडणुकीनंतर जवळजवळ संपत आलली ही सेना आणि तिचे वाघ पुन्हा एकदा डरकाळ्यासदृश आवाज काढीत फिरू लागले आहेत.
 इस्लामपूरहून, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची आणि या निवडणुका नातांतराच्या प्रश्नावर लढविण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखविली. निवडणुकीच्या राजकारणापोटी साऱ्या राज्यभर जातीय दंगलींचा वणवा शिलगावण्याचा धोका हे सत्तातुर सर्व विधिनिषेध आणि संकोच सोडून करू लागले आहेत.
 महाराष्ट्रातील पुढची निवडणूक नामांतराच्या प्रश्नावर व्हावी ही कल्पना कोणा जबाबदार माणसाच्या तोंडून बाहेर पडावी, हे चित्रच मोठे भयानक आहे. सगळ्या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात इतक्या जटिल समस्या आणि बिकट प्रश्न आहेत, त्या सर्वांना बाजूस सारून नामांतराच्या प्रश्नावर निवडणुका घेणे म्हणजे निव्वळ जातीच्या मतांचे राजकारण करणे आहे. सर्वसामान्य लोकांच्या नजरेत नामांतर, विकास महामंडळे, सीमावाद हे सगळे किरकोळ प्रश्न आहेत. लोकांना दररोज जाळणाऱ्या चिंता वेगळ्या आहेत. लोकशाही आणि निवडणुका या कल्पनांना काही अर्थ उरला असेल, तर निवडणुकांच्या निमित्ताने विचारमंथन या महत्त्वाच्या समस्यांवर व्हायला पाहिजे.

 लोकांच्या महत्त्वाच्या आशाआकांक्षा काय आहेत ? फार साध्या आणि सोप्या आहेत.

पोशिंद्यांची लोकशाही / ४६