Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जनता दलाचे मी मी म्हणवणारे नेते अधिकाराच्या खुर्चीसाठी पक्ष सोडून गेले. संघटनेचे आमदार कोणत्याही मोहाला बळी न पडता, जनता दलातच राहिले; हरेक प्रश्नावर जनता दलाशी मतभिन्नता असून, त्यांनी आपली भूमिका बदलली नाही.
 'सामाजिक न्याय' अशा गोंडस घोषणेखाली जनता दलाने सरकारी नोकरीतील राखीव जागांचा प्रश्न उभा केला. संघटनेने राखीव जागांचा प्रश्न गरिबी हटविण्याशी अप्रस्तुत असा मानला आहे. सर्वांना पुरतील इतके रोजगार उपलब्ध होणे शक्य नाही; त्यामुळे राखीव जागांनी मूठभर दलितांचेसुद्धा भले होणार नाही; मागासवर्गीय परंपरेने बलुतेदार आणि हुन्नरी आहेत, त्यांचा प्रश्न नोकऱ्या देऊन सुटणार नाही; स्वयंरोजगारी उद्योजकांना पोषक अशी अर्थव्यवस्था दलितांचे भले करू शकेल; सरकारी नियोजनाच्या व्यवस्थेत ब्राह्मण, इतर सवर्ण आणि 'ब्राह्मणी' दलित यांचेच काय ते भले होऊ शकेल, सर्वसामान्य दलितांचे नाही; सरकारी नोकऱ्यांतील सवर्णांची मक्तेदारी तोडण्यासाठी, सरकारी नोकरशाहीचा वरचष्मा संपवण्यासाठी राखीव जागांचा उपयोग होईल; पण त्यामुळे दलितांचा प्रश्न सुटेल ही कल्पना खोटी, अशी संघटनेची राखीव जागांविषयीची भूमिका आहे. संघटना मंडलवादी नव्हती, मंडलविरोधी नव्हती, मंडलविरोधकांना विरोध करणारी होती.
 जनता दलातून चौधरी देवीलाल फुटून गेले आणि भा. ज. प. च्या राम मंदिराचा कार्यक्रम गाजू लागला, त्याला प्रत्युत्तर म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाची युगत काढली. त्यामागे अभ्यास नाही, निष्ठा नाही, दलितांविषयीची कळकळही नाही. या प्रश्नापासूनच जनता दलातील विचारांचा गोंधळ वाढत गेला. आर्थिक प्रश्नांऐवजी 'सामाजिक न्याया'चे राजकारण जनता दलाच्या अग्रणींना अधिक भावू लागले.

 राष्ट्रीय कृषी नीतीचा मसुदा कृषी सल्लागार समितीने जनता दलाच्या शासनास सादर केला. खुल्या अर्थव्यवस्थेतील खुल्या शेतीचे धोरण त्यात विस्तृतपणे मांडण्यात आले होते. खुल्या बाजारपेठेवर आधारित अर्थकारणाचा हा आराखडा जनता दलाच्या शासनास मानवला नाही. त्यांनी तो बाजूस टाकला. मंडल प्रश्नावर जनता दलाने जी हिंमत दाखवली, ती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दाखविली असती, तर आजपावेतो शासन जनता दलाचेच असते, जुन्या-पुराण्या नेहरू -नियोजन-व्यवस्थेला मूठमाती देण्याचे श्रेय दलाला मिळाले असते आणि त्याची आर्थिक क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी उज्ज्वल ठरली असती. जनता दलाने ही ऐतिहासिक संधी गमावली. अशी संधी गमावणाऱ्या राजकारण्यांना इतिहास

पोशिंद्यांची लोकशाही / ४१