पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत. त्यांतील ६५ रुपये नेते आणि अधिकारी यांची सरकारी यंत्रणाच खाऊन जाते.
 गरिबांच्या कणवेचा हा धंदा असा आहे. 'गरिबी दूर करतो' असे म्हणायचे, त्या आधारे मते मिळवायची, त्या आधारे सत्तेत आल्यानंतर वसूल होणाऱ्या करांपैकी नावापुरता एक तुकडा गरिबांच्या तोंडावर फेकायचा आणि आपण मोठे कनवाळू महात्मे आहोत अशी 'नौटंकी' करायची. पोटासाठी भीक मागणाऱ्याला भाकरी देऊ नये, कष्टाची भाकरी कमावण्यासाठी कुऱ्हाड द्यावी, हे जुने लोककथेतील शहाणपण आहे. कुऱ्हाड दिली तर भिकारी सन्मानाने जगू शकतो. भीक घातली, तर तो जन्माचा पुरुषार्थहीन, अपंग बनतो.
 आम आदमीचे नाव घ्यायचे आणि त्याला अपंग बनवण्याचे कारखाने काढायचे असा हा काँग्रेसी भीकवादाचा कार्यक्रम आहे. त्याबद्दल जाब विचारणारी कोणतीही आचारसंहिता नाही, कोणतेही शपथपत्र नाही आणि देखरेखही नाही; तोपर्यंत गरिबी वाढतच राहणारच आहे. गरिबांच्या कनवाळू महात्म्यांचीही पैदास होणार आणि त्यांचा धंदा फळफळणार, यात काही शंका नाही.

(६ एप्रिल २००९)

◆◆





पोशिंद्यांची लोकशाही / ३४३