पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभव आहे. नाव गरिबाचे घ्या आणि नेता, तस्कर, गुंडा, अफसर यांच्या द्वारे लयलूट करा असा हा काँग्रेसी कार्यक्रम आहे. हा करुणावादी कार्यक्रम कानाला मोठा गोड लागतो; पण या कार्यक्रमात एक भीषण दुष्टचक्र दडलेले आहे. सार्वजनिक क्षेत्राचा जितका दबदबा मोठा, तितका भ्रष्टाचार अधिक, तितकी गरिबी अधिक आणि गरिबी अधिक तितकी काँग्रेस आणि डाव्यांची चलती अधिक असा हा दुष्ट कार्यक्रम आहे.
 हात तोडण्याची भाषा करणारा वरुण गांधी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत जातो. याउलट, वर्षानुवर्षे सरकारी मदत आणि आश्रय यांच्या प्रलोभनाने लक्षावधी गरिबांना त्यांच्यातील पुरुषार्थ खच्ची करून, त्यांना जन्माने लुळे, पांगळे, अपंग बनवणाऱ्यांना मात्र राजकीय सत्ता आणि महात्मेपण दोन्हीही मिळते.
 निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा फार बोलबाला आहे. 'ऊँ' चा वापर एका विशिष्ट समाजाविरुद्ध झाला असा आकांत काँग्रेसी हरघडी करतात. आचारसंहितेचाही उपयोग अशाच पद्धतीने विरोधकांना खच्ची करण्याकरिता होत आहे.
 रोजगार हमी योजनेखाली रोजी वाढवून देऊ, रोजगाराचे दिवस वाढवून देऊ, असे सांगून निखळ भ्रष्टाचाराकरिता राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा पुरस्कार आणि पाठपुरावा म्हणजे काय आहे ? चांगल्या धडधाकट स्त्री-पुरुषांना स्वयंरोजगारी किंवा उद्योजक बनण्याचे प्रोत्साहन आणि त्यासाठी लागणारी साधनसंपत्ती देण्याचा कार्यक्रम सोडून, त्यांना जन्मभर माती-दगडाचे खोदकाम करण्यास भाग पाडणे, हा गरिबांचा शुद्ध वंशविच्छेद आहे. यातून गरिबी कधी संपणार नाही आणि गरिबांची कणव दाखवणाऱ्या लोकांची चलती राहील याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांना कोणत्या कायद्याखाली अटक होणार आहे?
 गरिबांकरिता आमचे सरकार कार्यक्रम चालवते, या फुशारक्यांमागे आणखी एक गुपित लपलेले आहे. गरिबांकरिता चाललेले हे कार्यक्रम, हे काही काँग्रेस नेत्यांच्या स्वित्झर्लंडमधील बँक खात्यातील रकमेतून चालवले जात नाहीत; प्रामाणिक करदात्यांनी सरकारी तिजोरीत भरलेल्या करांच्या रकमेतूनच हे तथाकथित गरिबांच्या मदतीचे कार्यक्रम चालवले जातात.
 गंमत अशी, की योजना आयोगाच्या अलीकडील एका अहवालानुसार केंद्र शासनाने खर्च केलेल्या १०० रुपयांपैकी ३५ रुपयेसुद्धा गरीबगुरिबांपर्यंत पोहोचत

पोशिंद्यांची लोकशाही / ३४२