पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परकोटीच्या क्रौर्याने चिरडून टाकण्यात आली. समाजवादाने चीनचा आर्थिक बट्ट्याबोळ केला; परंतु चिनी जनतेच्या अंगी शिस्तपालनाची क्षमता मुरवली आणि घट्ट केली. चीनच्या उदारीकरणाच्या धोरणाला उदंड यश मिळत आहे त्याचे कारण चीनमधील घट्ट कायदाव्यवस्था हे नाकारता येणार नाही. यामुळेच, एक चिनी कामगार पाच भारतीय मजुरांइतके काम करतो आणि चीनमध्ये उदारीकरणाचा फायदा घेणारा कोणी हर्षद मेहताही निघू शकत नाही, निघाला तर त्याची झटकन वासलात लावली जाते.
 भारतातील परिस्थिती याच्या नेमकी उलटी आहे. इंग्रजांनी आणलेली कायदाव्यवस्था महात्मा गांधीप्रणीत कायदेभंगाच्या उदात्तीकरणाने विस्कळित झाली. स्वातंत्र्याच्या चळवळीत केवळ गांधींच्या आदेशानुसार महिना दोन महिने तुरुंगात काढल्यावर बाहेर जनतेचे हारतुरे स्वीकारणाऱ्या देशभक्तांचाच बोलबाला झाला.
 पुन्हा ठग, पेंढारी
 इंग्रजी शिस्तपालनाची जबाबदारी असलेली प्रशासन व्यवस्था स्वातंत्र्यानंतर फारच थोडा काळ पुरली, नंतरच्या काळात कुशल प्रशासनासाठी आवश्यक ती कठोर मानसिकता धारण करू शकणारे नेतृत्व, गांधीवादी चळवळीमुळे, विजनवासात फेकले गेले. आपण जणू गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांचा वारसा चालवणारे नवे संप्रती अवतार आहोत अशा थाटात टिनपाट नेते बोलू लागले. कठोर निर्णय घेण्याच्या असमर्थतेचे उदात्तीकरण गांधींचे नाव घेऊन ही मंडळी करू लागली. नौखालीच्या दंगलीच्या काळात काहीही संरक्षण न घेता पायी फिरणाऱ्या महात्म्याचे नाव जे राज्यकर्ते 'झेड' सिक्युरिटीखेरीज घराच्या बाहेर पडू शकत नाहीत, ते सकाळ संध्याकाळ घेऊ लागले आहेत. चर्चिलची भविष्यवाणी खरी ठरली आणि स्वातंत्र्यानंतर शासनव्यवस्था कडबा भरलेल्या बुजगावण्यांच्या हाती गेली. या बुजगावण्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या खुन्यांनाही फासावर लटकवण्याची हिंमत झालेली नाही आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचे फोटो काही राज्यांत उघड उघड निवडणूकप्रचारासाठी वापरले जातात.
 स्वातंत्र्यचळवळीच्या तत्त्वज्ञानामुळे आणि नेहरूंच्या समाजवादी धांदलीमुळे इंग्रजांची देन कायदाव्यवस्था कोसळली आणि लायसन्स्-परमिट-कोटा प्रणालीतून नवे पेंढारी आणि ठग यांची जमात उभी राहून, तिनेच शासन ताब्यात घेतले आहे आणि देशभरात सर्वदूर हलकल्लोळ माजवला आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ३३०