पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इस्राईलच्या पद्धतीचा मुंहतोड़ जवाब देण्याची ज्यांची खुमखुमी असेल, त्यांना त्यासाठी देशाबाहेर काही करण्याची गरज नाही. देशाच्या आत अशी शक्तिकेंद्रे आणि मर्मबिंदू आहेत, की ज्यांना हात लावला तरी आतंकवादी पंगुवत लुळे पडतील. या मर्मबिंदूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 शासनाची जबाबदारी
 कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था ही 'एक डोके, एक मत' या पद्धतीने निवडून आलेल्या शासनाची सर्वप्रथम जबाबदारी आहे. निरपराध नागरिकांच्या संरक्षणासाठी काय वाटेल ते उपाय योजून, आतंकवाद्यांचे निर्दालन करणे ही जबाबदारी कोणाचे शासन निभावू शकेल, त्याला आपली मते गेली पाहिजेत.
 कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे कोणत्याही शासनाचे आद्यकर्तव्य होय. नागरिकांची मालमत्ता आणि जीवित यांचे संरक्षण करणे, नागरिकांतील दिवाणी वा फौजदारी वादावादीच्या निर्णयासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करणे हेही काम फक्त शासनच करू शकते. ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेत आर्थिक व्यवहार, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रांतही कोणताही विकास किंवा प्रगती होऊ शकत नाही. तीन उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
 इंग्रजांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आणि थोड्याफार का होईना, नागरी व्यवस्था आणि पायाभूत संरचना तयार केल्या.
 समाजवादी क्रांतीनंतर रशियात अर्निबध हुकूमशाही तयार झाली. त्या व्यवस्थेत व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाल्यामुळे क्षोभ निर्माण झाला आणि सर्वदूर पसरलेल्या असंतोषामुळे समाजवादी साम्राज्य कोसळले. या होष्यमानाचा अंदाज घेऊन चीन रशियापासून दूर सरकत होता आणि जे रशियाला जमले नाही, ते समाजवादी स्वप्न चीनमध्ये साकार करू अशा घमेंडीत त्यांनी रशियाच्या पाडावानंतरही थोडा काळ समाजवादी अंमल चालवला. समाजवादी अर्थव्यवस्था व्यवहारात अशक्य आहे हे स्पष्ट झाल्यानंतर चीनने अलगद समाजवादातून अंग काढून घेतले आणि खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरण यांचा तो पुरस्कर्ता बनला; पण हे करताना रशियाप्रमाणे त्यांनी पूर्वसुरींच्या नेत्यांचे उच्चाटन केले नाही. स्टॅलिनवादाचा कडक अंमल संपल्यावर रशिया कोसळला. याउलट, माओवाद आणि कम्युनिझम (साम्यवाद) ही आजही चीनची अधिकृत आर्थिक तत्त्वज्ञाने आहेत. खुलीकरणाला सुरुवात झाल्यानंतर त्याला सरकारी आखणीपेक्षा अधिक गती मिळावी अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निदर्शने तिएनमान चौकात

पोशिंद्यांची लोकशाही / ३२९