पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युक्तिवाद केला तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि संसदेच्या निणर्यांमध्ये अशा दोनचार वक्त्यांमुळे काहीही फरक पडत नाही. संसदेचे निर्णय संसदगृहाच्या बाहेर घेतले जातात त्याप्रमाणे पक्षाच्या सदस्यांना आदेश दिले जातात.
 निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पहिल्या बैठकीत संख्याबळ जास्त कोणत्या पक्षाकडे आहे, हे स्पष्ट झाले की त्यानंतर ५ वर्षांपर्यंत त्या पक्षाची अंदाधुंद हुकूमशाही चालत राहते. सर्वसामान्य सदस्यांना आपला विचार ऐकवण्याची आणि तो थोडाफार तरी प्रसारमाध्यमांत दिसावा याकरिता एकच मार्ग उरतो. कोणत्याही विषयावरील चर्चेच्या वेळी सभापतींच्या समोरील प्रांगणात उतरणे, आरडाओरडा करणे, संसदेचे काम तहकूब करून घेणे.संसद ही आता बाहुबली पहिलवानांचा आणि मोठे नरडे काढून ओरडणाऱ्या मल्लांचा आखाडा झाला आहे.
 स्वतंत्र भारतातील लोकशाहीला घराणेशाहीचा प्रादुर्भाव होईल अशी कल्पना स्वातंत्र्यआंदोलनाच्या काळी कोणी केली नसेल. त्या काळापासूनच एका घराण्यातील व्यक्तींनीच काँग्रेस पक्ष ताब्यात घेऊन, सत्तेची प्रमुख पदे वंशपरंपरेने स्वतःच्याच हातात राहतील, यासाठी भलेबुरे सर्व मार्ग वापरून, एक घराणेशाही प्रस्थापित केली आहे.
 निवडणुकांचा उपचार प्रशासकीय दृष्टीने ठाकठीक पार पडतो, एवढेच. भारतासारख्या विविध जाती, वंश, धर्म, भाषा आणि परंपरा असलेल्या देशात स्वीकारली गेलेली निवडणूक पद्धत अत्यंत घातक ठरली आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत योग्य ठरली असती. प्रत्येक पक्षाला देशभरात ज्या प्रमाणात मते मिळतील, त्या प्रमाणात त्याला विधिमंडळात त्याच्या पूर्वप्रकाशित यादीतून सदस्य पाठवता येतील. अशा या पद्धतीत गुंड, खुनी, दरोडेखोर आणि भ्रष्टाचारी यांना विधिमंडळात प्रवेश मिळणे दुरापास्त झाले असते.
 प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीस पर्याय म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान निम्म्याच्या वर मते मिळविणारा उमेदवारच विजयी घोषित होईल अशीही व्यवस्था योग्य ठरली असती. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरच्या काळात फाळणी, निर्वासितांचे लोंढे, वेगवेगळ्या प्रांतांत झालेले उठाव यांचा बंदोबस्त करण्यासाठी मजबूत बहुमत असलेल्या एका पक्षाच्या हाती सत्ता असणे आवश्यक आहे असा सोईस्कर गैरसमज काँग्रेस पक्षाच्या धुरीणांनी आपमतलबीपणाने करून घेतला. काँग्रेस या एकाच पक्षाचे सज्जड बहुमत स्वातंत्र्यानंतर पंचवीस

पोशिंद्यांची लोकशाही / ३२३