पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपला रंग जमवला आहे. घुसखोरांची चौकशी करून, त्यांना मायदेशी परत पाठवण्यासाठी रालोआच्या काळात एक वेगळे न्यायालय स्थापण्यात आले होते. 'त्यामुळेही काही निरपराध मुसलमानांना हैराण केले जाते,' अश्या मखलाशीने संपुआने एक नवी व्यवस्था उभी केली. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने, 'या संपुआप्रणीत नव्या व्यवस्थेत कोणाही घुसखोरावर कारवाई झाली नाही,' अशी टिप्पणी केली आहे. पण, तरीही आपली 'बांगलादेशी घुसखोर'धार्जिणी व्यवस्था बदलण्यास हे शासन तयार नाही.
 रालोआला हटवून डावे, दलित, आदिवासी आणि मुसलमान यांची ही संयुक्त पुरोगामी आघाडी 'हिंदुद्वेष म्हणजे पुरोगामित्व' असे वातावरण तयार करत आहे. त्यांच्या हिंदुत्वविरोधाचे समर्थन समजणे कठीण आहे. दस्तुरखुद्द, दिल्लीतील जामा मस्जिदीचे इमाम यांनीच निर्वाळा दिला आहे, की देशात जी निधार्मिकता आहे त्याचे श्रेय कोणा गांधी-नेहरूंना नाही आणि नेहरू-गांधींनाही नाही. ही निधार्मिकता हिंदूंच्या सहिष्णु प्रकृतीमुळे आहे.'
 समाजवादी रशियाच्या चढत्या काळात भारतात कम्युनिस्टांचे राज्य आले असते, तर आज बाजारपेठवाद मांडणाऱ्या सर्वांचे त्यांनी शिरकाण केले असते हे कम्युनिझमच्या प्रसाराच्या इतिहासावरून स्पष्ट आहे. एक पश्चिम बंगाल हाती लागला, तर मार्क्सवाद्यांनी तेथे पोलिस व होमगार्ड दलांत लालभाईंची भरती करून, दडपशाहीचे काय तांडव केले ते नुकतेच नंदीग्राममध्ये जगाने पाहिले आहे.
 मुसलमान अमदनीत काय होते, या अनुभवाचे चटके लोक अजून विसरलेले नाहीत. ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी धर्मपरिवर्तनासाठी गोव्यात काय थैमान घातले याचीही नोंद इतिहासात आहे. अशा सगळ्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर या हिंदुबाहुल्य देशात मुसलमान राष्ट्रपती, शीख पंतप्रधान, सत्तारूढ संपुआच्या अध्यक्ष कॅथॉलिक ख्रिश्चन आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दलित समाजातील हे सहिष्णुतेचे आणि निधार्मिकतेचे जगभरातील अनन्यसाधारण ज्वलंत उदाहरण आहे.
 देशांतर्गत राजकारणाच्या सोयीने भाजपचा काटा काढण्यासाठी गुजराथमधील दंग्यांचा वापर, १९८४ मध्ये दिल्लीत शिखांचे शिरकाण घडवून आणणाऱ्या काँग्रेसपक्षीयांनी प्रचरासाठी करावा हा विनोद आहे; पण समजण्यासारखा विनोद आहे; पण, या हिंदुद्वेषाचा उपयोग राष्ट्रहिताला बाधा आणण्यापर्यंत करावा, यामागील मनोवृत्ती समजणे दुरापास्त आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / ३१६