पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अन्याय न सोसताही मागासलेपणाचा फायदा मिळवण्याची हाव आणि, सर्वांत शेवटी, एक ग्रंथ, एक प्रेषित व एका अपरिचित लिपीचा भुईकोट किल्ला बांधून, त्यात स्वतःला कोंडून घेतलेल्या मुसलमान समाजाचा मागासलेपणाचा आक्रोश या समान प्रकृतीमुळे या चार समाजांचेही एक गठबंधन होऊ लागले आहे. या गठबंधनाच्या नजरेत समान शत्रू जास्तीत जास्त सवर्ण हिंदूच असायला पाहिजे. पण, अल्पसंख्याक सोडल्यास बाकी सारे हिंदू अशा हिंदुत्ववादी आग्रहामुळे आणि संपुआच्या राजकीय दबावामुळे त्या सर्वांना सर्व हिंदूच आपले समान शत्रू वाटतात.
 दलित समाजाला नेतृत्व दिले ते बहुजन समाजातील अनेक लोकोत्तर नेत्यांनी. महाराष्ट्रात ही परंपरा जोतीबा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. मुसलमान समाजातील अलगवादाचे उत्तरदायित्व महात्मा गांधी आणि बॅ. जीना यांना जाते. त्यानंतरच्या काळात मुसलमानांच्या आर्थिक पीछेहाटीच्या प्रश्नाला बगल देऊन, सामाजिक प्रश्नाला प्राधान्य देण्याचे कौशल्य अनेकांनी दाखवले. मशिदीवर ध्वनिवर्धक लावणे, त्यांना पैसा पुरवणे हे काम करणाऱ्यांचा त्यात वाटा आहे. मुसलमान समाजाच्या बकालीकरणामुळे त्यातील तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळू लागली; त्यामुळे, दाऊद इब्राहिम इत्यादी माफियांचाही त्यात मोठा हिस्सा आहे.
 आदिवासी समाजात लोकधुरीण नेते होऊन गेले. त्यांनी केलेली बंडे कंपनी राज्याच्या आणि इंग्रजी अमलाच्या सुरुवातीच्या काळातच कठोरपणे मोडून काढण्यात आली. त्यानंतर त्यांचे असे नेतृत्व उभे राहिलेच नाही. शहरातील पांढरपेशा वर्गातील डाव्या चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य आदिवासी कार्याला दिले. त्यांनी जंगलभागातील आदिवासीचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध लढेही उभे केले. पण, ती पिढी संपली तसे बहुतेक ठिकाणी काँग्रेसी नेत्यांनी आदिवासी समाजावर प्रभुत्व स्थापित केले. शाहू समाजाच्या आसपासच्या काही आदिवासी प्रदेशात या काँग्रेसी नेत्यांनी सरकारी खर्चाने काही चांगल्या योजना राबवल्याही. परिणामतः, त्यांचे या समाजावरील वर्चस्व आजही राजकीय निवडणुकांत दिसून येते. शाहू वस्तीपासून दूरवर असलेल्या आदिवासी प्रदेशांकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. आज त्या प्रदेशात नक्षलवाद्यांनी आपले वर्चस्व जमवले आहे. या नक्षलवाद्यांचा आणि बंगालमधील जुन्या नक्षलवाद्यांचा तसा काहीच संबंध नाही. त्यांच्यात कोणीही अभ्यासक नाहीत आणि ध्येयवेडेही नाहीत. शाहू समाजात प्रवेश मिळविण्यात असफल

पोशिंद्यांची लोकशाही / ३१४