पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले, भारतीय उद्योजकांचे श्वास थोडे मोकळे झाले. परदेशांतून येऊ लागलेल्या गुंतवणुकीचा उपयोग करून, त्यांनी औद्योगिक विकासाची घोडदौड चालू केली. दहा वर्षांत भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या. परदेशांतील मोठे उद्योगधंदे त्यांनी ताब्यात घेतले. जगातील पहिल्या ५०० उद्योजकांत १० टक्के भारतीय चेहरे दिसू लागले. ही सारी कर्तबगारी, पंडित नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेत साखळदंडांनी जखडून ठेवलेल्या उद्योजकांना ९० च्या दशकात थोडी ढील मिळाली; त्यामुळे साकार झाली. नेहरूवादाची निष्फलता डॉ. मनमोहन सिंह यांनी (नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली) उघडी पाडली, अर्थव्यवस्थेने घूम जाव केले म्हणून हे साधले.
 सवर्ण भारतीयांचा देशात रागराग चालू आहे. या समाजातील बहुसंख्य मंडळी विशेष प्रतिभासंपन्न व बुद्धिमान आहेत, हे आज जगन्मान्य झाले आहे. गणकशास्त्राच्या आघाडीच्या क्षेत्रात त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवली. अमेरिकेसारखे सुधारलेले जग जेव्हा झोपी गेलेले असते तेव्हा आपल्याकडे दिवस असतो, या परिस्थितीचा फायदा घेऊन माहितीक्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. या क्षेत्रातील प्रगतीचे श्रेय रालोआ, अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे जाते. भारतीय उद्योजक आणि बुद्धिजीवी वर्गांनी घेतलेली ही छलांग दीर्घ पल्ल्याची आहे. ही छलांग आता भारताला एक अग्रेसर देश बनवल्याखेरीज थांबणार नाही.
 याचे श्रेय कोणत्याही पक्षाने किंवा आघाडीने का घ्यावे? शासनातील सत्तेने काही चांगला कार्यक्रम राबवला म्हणून ही प्रगती झाली असे कोणालाच म्हणता येणार नाही. शासनाने ज्या प्रमाणात उत्पादकवर्गाला - उद्योजकांना, कारखानदारांना आणि शेतकऱ्यांना - जाच करायचे टाळले, तितक्या प्रमाणात विकासाची गती वाढत आहे आणि वाढत राहील. या विकासाला खीळ बसण्यासाठी काही उपद्व्याप शासन करील, तर तेवढ्या प्रमाणात विकासाची गती कमी होईल. शासनाला प्रशासकीय खर्च ताब्यात ठेवता आला नाही, अंदाजपत्रकी तूट सांभाळता आली नाही किंवा महागाईचा दर कह्यात ठेवता आला नाही, तर बंधनातून अंशतः सुटलेल्या एका वर्गाने प्रगतीची ही जी छलांग मारली आहे तिचा दम तुटेल.
 "रालोआचे अर्थकारण हे एकांगी होते, सर्वसमावेशक नव्हते; याउलट, संपुआचे अर्थकारण सर्वसमावेशक आहे, 'आम आदमी'चे भले करण्यासाठी आहे; दलित, आदिवासी, अल्पसंख्याक (मुसलमान) यांच्या हिताचे आहे एवढेच

पोशिंद्यांची लोकशाही / ३११