पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण शेतकरी संघटनेच्या वैभवाच्या काळाबद्दल बोलतो. त्या काळात शेतकरी संघटनेने जो विचार मांडला, त्याची एक प्रतिष्ठा होती, त्याने समाजात संघटनेची एक प्रतिमा तयार झाली. भूतकाळात कमावलेली ही प्रतिष्ठा जर आपण गमावली तर निवडणुकीत कितीही यश मिळाले, तरी ते चिरस्थायी असणार नाही. तेव्हा 'सध्या आहे ते तसेच चालू द्या, काय भूमिका घ्यायची ते पुढे ठरवू,' असा काही टांगता निर्णय घेऊ नका की ज्यामुळे मला आणि तुम्हालाही पत्रकारांच्या आणि ज्या समाजाला आपल्यामध्ये काही वेगळ्या आणि सकारात्मक भूमिकेची प्रतिमा दिसली, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पंचाईत झाल्यासारखे वाटेल.
 याबाबतीत ठोस निर्णय या कार्यकारिणीत आणि इतक्या कमी वेळात होणे शक्य नाही आणि उचितही होणार नाही. त्यासाठी शेतकरी संघटना कुटुंबाचे अधिवेशन बोलावूया. या अधिवेशनात दोनचार दिवस व्यापक विचारविनिमय करूनच निर्णय घेऊया, अशी विनंती करून शेतकरी संघटनेचा पाईक म्हणून केलेले माझे हे निवेदन थांबवतो.

(६-२१ डिसेंबर २००४)

◆◆





पोशिंद्यांची लोकशाही / ३०५