पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघटनेच्या आंबेठाण येथील शिबिरात मी वारंवार सांगितले आहे, की समाजवादी राजवटीने गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्या समाजमनात शेतकरी संघटनेने स्वातंत्र्याच्या बीजाचे पुनरारोपण केले. 'सगळ्या इतिहासाची दिशा आणि गती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संघटना स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवत जाते; जो जो स्वातंत्र्याला बंधन घालू पाहतो त्याला त्याला समाज व इतिहास सोडून देतो' हा मूलभूत विचार शेतकरी संघटनेने समाजात पुनर्प्रस्थापित केला. शेतकरी संघटनेच्या पाइकांना लाभलेला हा स्वातंत्र्याचा वसा टाकन जर आपण 'गुजराथ्यांना हटवा, बिहाऱ्यांना हटवा' अशासारख्या गर्जना करणाऱ्यांच्या झुंडगिरीपुढे नमलो, तर आपण कमावलेले सर्व काही क्षणार्धात निसटून जाईल. निवडणुकीसाठी एकत्र आलो म्हणजे काही आपण आपला स्वातंत्र्याचा विचार सोडून दिला असे नाही. लग्नानंतर मुले झाली, की नवराबायको मुलांच्या जबाबदारीच्या नावाने, एकमेकांचे आचारविचार जुळत नसताना संसार रेटतच राहतात. तसे काही आपल्याला करण्याची गरज नाही. आपण भाजप-शिवसेनेबरोबर युती केल्यानंतर प्रश्नांना उत्तरे देताना पंचाईत होते असे कितीतरी प्रसंग गेल्या चार वर्षांत आपल्यावर आले, इतकी त्यांच्या आणि आपल्या विचारांत तफावत आहे. गेली पंचवीस वर्षे आपण आपला विचार किती मस्तीत मांडत होतो आणि या युतीमुळे आपल्याला किती नरमाईने वागावे लागते, याच्या असह्य वेदना होतात. तेव्हा ही 'कुसंगत' चालूच ठेवायची का सोडायची याचा निर्णय घ्यायला हवा. शेतकरी संघटनेचे 'संन्याशाचे वैभव' दोनपाच आमदारांच्या लालसेमुळे नष्ट होणार असेल तर फेरविचार करणे आवश्यक आहे. हे वैभव जर टिकवून ठेवता आले नाही, तर शेतकरी संघटनेला भविष्य नाही हे निश्चित.
 निवडणुकीच्या राजकारणात जात आणि पैसा यांची समीकरणे सर्वच पक्ष वापरतात आणि कमीअधिक प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसतात. ही समीकरणे वापरून एका निवडणुकीत यशस्वी झालेले उमेदवार आणि पक्ष, तीच समीकरणे वापरणारे विरोधी उमेदवार आणि पक्ष यांच्याकडून पुढील निवडणुकीत पराभूत होताना दिसतात. जात आणि पैसा यांच्या समीकरणाच्या आधाराने मिळणारे यश चिरस्थायी नसते. तेव्हा अशा परिस्थितीतही जात आणि पैसा यांची समीकरणे वापरण्याऐवजी केवळ आपला विचार मांडून, कर्जमुक्तीच्या आधाराने निवडणुका जिंकणे आपल्याला शक्य होईल का? मला असे वाटते, की हे अशक्य नाही. तुम्हाला उमेद द्यावी किंवा स्फूर्ती यावी यासाठी केवळ मी हे बोलत नाही.

पोशिंद्यांची लोकशाही / ३०४