पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकी व्हायची असेल तर ती काही तत्त्वे, काही सिद्धांत यांच्या आधाराने झाली पाहिजे. सर्व ठोकळ्यांचा भुसा केला आणि सरस मिसळून, त्याचा दाबून एक ठोकळा केला तरच खरी एकी होऊन निवडणूक जिंकता येऊ शकेल आणि हा प्रचंड यज्ञ करताना जे नवे नेतृत्व पुढे येईल ते नेतृत्व जर प्रतिभावान असेल, धाडसी असेल, कर्तबगार असेल, तरच देशाला वाचवण्याची भाषा करणे उचित होईल.
 पण एखाद्या निर्णयाच्या वेळी नेतृत्वामध्ये जरा कुठे कमकुवत धागा सापडला, की त्याला जर आपण व्यावहारिकतेचे धडे देऊन, त्याच्यावर शेण आणि धोंडे मारायला लागत असू, तर स्वतंत्रताविरोधी आणि विकासविरोधी ताकदींच्या हातून देशाची सुटका होणे शक्य नाही. निर्णयामध्ये जरी काही त्रुटी आहेत, असे वाटले तरी तो घेणारे नेतृत्व लोकांपुढे जाते, आपली भूमिका मांडते आणि त्यावरच आजपर्यंत संघटना चालली आहे, हे लक्षात घेऊन, ऐन लढाईच्या काळात विसंवाद तयार करून नेतृत्वाचा आणि पर्यायाने संघटनेचा घात करणे कोणाच्याच फायद्याचे असत नाही.
 निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आणि नेतृत्वाच्या आधाराने होत असतात. आपल्या देशात विरोधी पक्षांत जयप्रकाश नारायणांनंतर असे समर्थ नेतृत्व पुढे आले नाही. जे पुढे आले ते लालुप्रसादांसारखे. ते कितीही निवडून येवोत; पण त्यांच्याबद्दल आदर वाटण्याचे काहीच कारण नाही. अशा परिस्थितीमध्ये चारित्र्यसंपन्न, प्रतिभावान, बुद्धिमान, कर्तृत्ववान अशा तऱ्हेचे नेतृत्व आपल्याला हवे असेल, तर अशा रूपात पुढे येणाऱ्या व्यक्तीला नाउमेद करणारी आणि सगळेच उत्तरदायित्व त्याच्या एकट्याच्या माथी मारणारी प्रवृत्ती टाकून द्यायला हवी. स्वतंत्र भारत पक्षाचा एक आमदार असो की दहा, ते जोपर्यंत शेतकरी संघटनेच्या विचाराने चालणार असतील, तोपर्यंत त्यांना महत्त्व राहील. भाजपप्रमाणे दोनाचे दिडशे काय अगदी दोनशे तीन आमदार जरी स्वतंत्र भारत पक्षाचे झाले आणि ते जर चुकीच्या - शेतकरी संघटनाविपरीत विचाराच्या-आधाराने जाणारे असतील तर इतिहासात शेतकरी संघटनेची नोंद 'अशीही एक संघटना होऊन गेली, काही काळ तिचा प्रभाव होता,' इतपतच होईल.
 शेतकरी संघटनेचे नाव इतिहासात ठळकपणे नोंदले गेले पाहिजे अशी अपेक्षा बाळगण्याइतकी आपली ताकद आहे काय? निश्चितच आहे. शेतकरी

पोशिंद्यांची लोकशाही / ३०३