पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागा मिळतील त्या लढवून, त्यापैकी चारपाच आमदार जरी आपले झाले, तरी तेवढ्या पायावर आपल्याला भविष्यात आपले बळ वाढवता येईल. आता माझे वय जसजसे वाढत चालले आहे तसतसे कमी वयाच्या, जास्त उमेदीच्या माणसांचा सल्ला ऐकणे, त्यांच्या मताने चालणे आणि त्यांना मदत करणे दिवसेंदिवस अधिक आवश्यक होत चाले आहे. त्यामुळे या वेळी, या क्षेत्रातले जाणकार आणि प्रचंड उत्साही, प्रचंड कष्ट करणारे असे जे माझ्याभोवती कार्यकर्ते होते, त्यांचा सल्ला मी ऐकला.
 इतके सगळे घडल्यानंतर विधानसभेत कोण कोण जातील, ते पुढे पाच वर्षे काय काम करतील, त्याच्यापुढे शेतकरी संघटना किती मजबूत होईल हा माझ्या आयुष्यात घडणारा इतिहास कदाचित नसेल, तेव्हा आपल्यानंतर जी माणसे शेतकरी संघटनेची धुरा घेणार असतील त्यांचे ऐकणे योग्यच आहे. तेव्हा आजपर्यंत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाची जी जबाबदारी मी सांभाळली ती हळूहळू अशा माणसांच्या हाती सोपवणे आवश्यक आहे, या हेतूने मला न पटणाऱ्या गोष्टी मी मान्य करीत आलो. त्याही वेळी मी सांगितले, की तुमच्या या प्रचारामध्ये मला गोवू नका, बोलताना मला ओकारी येते. ते म्हणाले, 'मग तुम्ही प्रचाराला येऊ नका, चालेल. तशी मला सुटी दिली, तर माझी काही तक्रार नव्हती. आतासुद्धा आधी जो निर्णय झाला, त्यावर बोलतो आहे असे नाही. याच्यापेक्षा जास्त चांगला निर्णय झाला असता, असेही मी म्हणत नाही; पण तो निर्णय करायला लागल्यानंतर ज्यांनी निर्णय घेतला, त्यांनी प्रामुख्याने प्रचाराची धुरा सांभाळली पाहिजे; आता निर्णय झालाच आहे तर पुन्हा शरद जोशींनीच फिरायला पाहिजे असे म्हणता कामा नये.
 मला असे वाटते, की शेतकरी संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासामध्ये आपल्याला सगळ्यांत मोठी उपयोगी अशी जी गोष्ट ठरली ती म्हणजे ज्याला 'शरद जोशींचा विचार,' असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते ती होय. राजकीय तडजोड म्हणून आज या पक्षाशी युती, उद्या त्या पक्षाशी युती आपल्याला करावी लागते याचे मलाही दुःख होते. मागे आपण विश्वनाथ प्रताप सिंहांबरोबर गेलो. त्या वेळी त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर जेव्हा ते कोल्हापूरला आपल्या मेळाव्याकरिता आले, तेव्हा त्यांना मी स्पष्टपणे सांगितले होते, की तुम्ही मंडल आयोगाचा कार्यक्रम घेता हे चूक आहे, याच्यापुढे आम्ही तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. युती केली म्हणजे काही आपण आपली तत्त्वे सोडून दिली असे

पोशिंद्यांची लोकशाही / ३०१