पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत, ज्यांना जमतात त्यांनी सांगितले, की आपण ऐंशीनव्वद जागी उमेदवार उभे केले तर त्यातील एकसुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही. मागे बघून मते बदलणे चुकीचे आहे. पण, शिरोळमध्ये राजू शेट्टी निवडून येतात, मोर्शीत दिलीप भोयरना चांगली मते पडतात, हे पाहिले तर आपल्या पायावर उभे राहून स्वतंत्र भारत पक्षाची फार वाईट अवस्था झाली असती असे काही मला वाटत नाही. वामनराव चटप तर निवडून येणारच होते. त्यांच्या यशाचा संबंध भाजपशी नाही आणि स्वतंत्र भारत पक्षाशीही नाही; निवडून येतात ते वामनराव चटप निवडून येतात. मागील निवडणुकीत हरल्यापासून त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेपासून गावपातळीपर्यंत राजकीय बांधणी करण्यासाठी सातत्याने प्रचंड परिश्रम घेतले, म्हणून ते निवडून आले. ते आपल्यात आहेत हे आपले भाग्य आहे, आपल्यामुळे त्यांचे भाग्य उजळले असे नाही.
 जर का आपण आपले मतदारसंघ अशा तऱ्हेने उभे केले असते, तर ही वेळ आपल्यावर आली नसती. तीन वर्षांपूर्वी आपण पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. तेव्हा मी सांगितले होते, की ज्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे किमान दहा हजार सदस्य तयार होतील त्या मतदारसंघात मी स्वतः येऊन तेथील कार्यकर्त्यांचे कौतुक करीन. सगळे मिळून फक्त तीन मतदारसंघ - राजुरा, शिरोळ आणि बदनापूर - की ज्यांनी दहा हजार सदस्य तयार केले. या तीन जागांपैकी आपल्याला फक्त एक जागा मिळाली तिथे वामनराव चटप निवडून आले; शिरोळला आपल्यापासून दूर झालेले राजू शेट्टी निवडून आले आणि माझी खात्री आहे, की आपल्याला युतीत न सुटलेल्या बदनापूरमधून डॉ. अप्पासाहेब कदमांनी बंडखोरी केली असती तर तेही निवडून आले असते. आपण मुळामध्ये जे काम करायला पाहिजे ते काम पुरेसे नाही. ते केले असते तर त्याचा उपयोग निवडणुकीसंबंधी युतीची बोलणी करताना झाला असता. ते काम न झाल्यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटींच्या प्रक्रियेत, जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली तसतशी माझीसुद्धा फरफट होऊ लागली. १९८० मध्ये माझे जे वय होते, माझी जी प्रकृती होती तशीच जर आज असती तर मी निर्णय घेतला असता, की आपल्याला स्वतःच्या ताकदीवर लढता येत नाही ना, मग बाळासाहेब ठाकऱ्यांबरोबर युती करण्यापेक्षा आपण ही निवडणूक जाऊ देऊ; एकही उमेदवार उभा करता आला नाही तरी चालेल; पण हा डाग नको. मी म्हणून पाहिले; पण काही जणांनी म्हटले, की युतीत ज्या काही आठदहा

पोशिंद्यांची लोकशाही / ३००