पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजूला ठेवण्याची निर्धारी कठोरता या बाबी ठळकपणे लक्षात आल्या. रालोआच्या नेतृत्वाच्या या वैशिष्ट्यामुळेच स्वतंत्रतेच्या संकल्पनेला या नेतृत्वाखालीच काही आशा असू शकते, या विचारानेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र भारत पक्षाने रालोआचा घटक पक्ष होण्याचा निर्णय घेतला. वाजपेयींच्या नेतृत्वगुणाचे हे विश्लेषण मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये मांडले तेव्हा खुद्द भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा आश्चर्यचकित होऊन मोठ्या प्रांजळपणे कबूल केले, की आपल्या नेत्याची ही थोरवी माझ्या भाषणांमुळे प्रथमच लक्षात आली.
 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हीच भूमिका कायम ठेवताना गाठ पडली महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा युतीशी. ही भूमिका निभावून नेताना माझी मोठी कुचंबणा होते आहे, ती मी प्रामाणिकपणे पुढे ठेवू इच्छितो. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीने या विधानसभा निवडणुकीच्या काळात स्वतंत्र भारत पक्षाला आणि शेतकरी संघटनेला जी वागणूक दिली, ती पाहता यापुढे रालोआच्या सदस्यत्वामुळे स्वीकारावी लागलेली ही युती चालू ठेवावी का, या प्रश्नावर चर्चा करताना काही कार्यकर्त्यांनी म्हटले, 'आता लगेच काही निवडणुका नाहीत, मग युती ठेवली काय किंवा तोडली काय, काय फरक पडणार? भाजपचे धोरण काय आहे त्याच्याशी आपल्याला काय करायचे आहे, शिवसेनेची धोरणे काय आहेत आणि त्यांच्या रीती काय आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचे आहे? आपण आपल्याला काय करायचे आहे त्यावर चर्चा करावी, त्यानुसार कार्यक्रम करावे; पण युतीतील इतरांबद्दल काही बोलू नये.' अशा तऱ्हेने भूमिका घ्यायची म्हणजे माझी मोठी अडचण होते. कारण, अशा तऱ्हेने मी कधी जगलो नाही, अशा तऱ्हेने मी कधी बोललो नाही आणि अशा तऱ्हेने मी कधी काम केले नाही. कोणाला मान्य नसले तरी चालेल; पण मला जे योग्य वाटते ते सांगणे हे माझे काम आहे.
 मला असे वाटते, की शेतकरी संघटनेचे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे बुद्धिवैभव ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. डंकेल प्रस्तावाच्या वेळी त्याच्या बाजूने मी उभा राहिलो आणि म्हटले, की आम्हा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे आहे, आम्ही बरबाद झालो तरी चालेल, आम्हाला मरण यायचेच असेल तर ते स्वातंत्र्यात येऊ द्या. त्या वेळी ही भूमिका जर मी मांडली नसती तर, माझी खात्री आहे, की शेतकरी संघटनासुद्धा स्वदेशी जागरण मंच, कम्युनिस्ट आणि जागतिकीकरणाला

पोशिंद्यांची लोकशाही / २९६