पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. माझी मांडणी कामगार चळवळीला पटणार नाही याची मला खात्री होतीच; पण ही मांडणी काँग्रेसला पटेल का, जनता पक्षाला पटेल का, असा विचारही मी केला नाही. सर्व प्रस्थापितांना नाराज करणारी, दुःखी करणारी शेतकरी चळवळ बांधताना मी कधीही घाबरलो नाही, थकलो नाही. कारण माझ्या अभ्यासाच्या आधाराने मला जे खरे दिसत होते तेच मी शेतकऱ्यांना, लोकांना सांगत होतो - ते त्यांना पटो, ना पटो. या मांडणीतील सार लोकांच्या ध्यानात यावे म्हणून दक्षिण महाराष्ट्रात बोलताना मान्यवर नेत्यांची नावे घ्यावी लागत, नगर-नाशिकमध्ये बोलताना साखर कारखानदारांची नावे घ्यावी लागत. त्यातल्या काही कारखानदारांनी 'काय बामण सांगतोय?' म्हणून कुचेष्टा केली. काहींनी तर धमक्यासुद्धा दिल्या. पण, मी माझ्या कामातून मागे हटलो नाही. त्याचे कारण असे, की ज्याचे मन शुद्ध असते, विचार शुद्ध असतात त्या माणसाला, साहजिकच, एक नैष्ठिकता प्राप्त होते.
 बरेचदा असे म्हटले जाते, की शरद जोशींना वीसपंचवीस वर्षे पुढचे दिसते. काही काही बाबतीत, अपघाताने का होईना, हे खरे ठरले आहे, हे मला मान्य आहे. पण, याचा अर्थ माझ्यात काही अतींद्रिय शक्ती आहे असा नाही. आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ असल्या म्हणजे बरेच दूरचे आणि स्पष्ट दिसते; काचांवर जर डाग असले तर जवळचेही धूसर दिसते किंवा काचांवर जर एखादा रंग दिला तर समोरच्या परिस्थितीचे खरे चित्र समजत नाही. शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नाच्या अभ्यासाने माझ्या काचा साफ केल्याने मला महाराष्ट्रातील साखर कारखानदारी कोसळणार आहे, हे १९८२ मध्येच दिसले, महिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे हे १९८६ मध्ये दिसले आणि त्याच स्वच्छ काचांतून पाहत असल्यामुळे, सगळ्या देशातील लोक जागतिक व्यापारासंबंधीच्या डंकेल प्रस्तावाविरुद्ध बोलत असतानाही त्याच्या बाजूने मी एकटा उभा राहिलो. शेतकरी संघटनेचा एकही कार्यकर्ता सुरुवातीला माझ्या बाजूने उभा नव्हता. तरीसुद्धा, सत्य आणि विचारशक्तीच्या आधाराने मी ते मांडले.
 राजकारण हा काही तर्काचा खेळ नसतो. राजकारण हा संभाव्य काय आहे आणि असंभाव्य काय याचा विचार करून, खेळावयाचा (ईस द प इर्दैत) खेळ असतो. केवळ तर्कशास्त्राने किंवा केवळ बुद्धीने चालणारा हा खेळ नाही. आणि तरीसुद्धा मला असे वाटते, की राजकारणात पडून, निवडणुका लढवून

पोशिंद्यांची लोकशाही / २९४