पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजकारण खेळणारी लालूप्रसाद, पास्वान इत्यादींची टोळी यांचे संपुआ (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकार स्थापन झाले. संपुआच्या चारपाच महिन्यांच्या कारकिर्दीत सरकार संपूर्णपणे ठप्प झाले आहे. संसदेत काहीच काम होत नाही. आर्थिक सुधारांच्या सर्वच कार्यक्रमांत डाव्यांनी खोडा घातला आहे. तेवढ्याही काळात हज यात्रेकरूंना विशेष सवलती, मुसलमानांना राखीव जागा अशा तऱ्हेने अनुनयाचे कार्यक्रम राबवून, भगवीकरणाला विरोध करण्याच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे कार्यक्रम बेबंद चालू आहेत. हिंदुत्वाचा उद्घोष करणाऱ्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गेल्या पाच वर्षांत आटोक्यात ठेवले होते, तर संपुआने अतिरेकी हिंदुद्वेषाचे वातावरण विनाकारण तयार केले. त्यामुळे, देशात रालोआ सरकारच्या कारकिर्दीत तयार झालेली आत्मसन्मानाची आणि आत्मविश्वासाची भावना झपाट्याने खचत आहे. संपुआचे सरकार संपवणे ही देशाची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करणे आवश्यक आहे.
 ३) १९८४ सालापासून शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पुरस्कार केला आहे. शेतीवरील कर्जे बेकायदेशीर आहेत आणि अनैतिकही आहेत; शेतकऱ्यांच्या देण्याघेण्याचा लेखाजोखा मांडला तर शेतकरी ना कर्ज, ना कर, ना विजेचे बिल देणे लागतो. शेतकरी संघटनेने चालवलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना काही आधार मिळाला, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या महाराष्ट्रातच हजारोच्या वर गेली असती. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या पक्षांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि विनामूल्य वीज यांचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. त्यामुळे १९८४ नंतर प्रथमच कर्जमुक्ती हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा झाला आहे. हजारो वर्षांच्या कर्जबाजारीपणानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी मिळाली आहे. कर्जमुक्ती हा एकच उमेदवार समजून, सर्वांनी कर्जमुक्तीस विजयी करावे आणि सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आपल्या पितरांना कर्जमुक्तीचे तर्पण करून, शांती मिळवून द्यावी.
 या निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट आहे, की शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीला जसा भरघोस पाठिंबा द्यायला पाहिजे होता तसा दिलेला नाही. वीजबिल न देण्याचे आंदोलन वर्षानुवर्षे चालल्यानंतर वीज मोफत देण्याची काही आवश्यकता नाही, असे खुलेआम सांगणाऱ्या आणि उसाची वैधानिक किमान किंमत देता येणे शक्य नाही असे उघडपणे सांगणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वांत अधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री त्यांच्याच

पोशिंद्यांची लोकशाही / २८९