पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि त्यामुळे काँग्रेस सत्तेवर आली, तर फारशी चिंता करण्याची गरज नाही.
 युतीचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समर्थनासाठी मी जी भाषणे केली, ती अत्यंत तर्कशुद्ध होती. भाजपातील नेतेसुद्धा म्हणाले, की तुम्ही अटलजींच्या नेतृत्वाबद्दल जी मांडणी केली, तितकी तर्कशुद्ध मांडणी आमच्यातील लोकांनाही करणे जमले नाही.
 महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीबरोबरच राहण्याच्या पर्यायावर बोलायचे म्हणजे माझ्यापुढे गंभीर प्रश्न पडला आहे. युतीच्या नेत्यांनी बोलणी करण्यात दिरंगाई केल्याबद्दल आजच्या बैठकीत तुम्ही कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या, त्यांवरून या मुद्द्याचे गांभीर्य अधिक खोल झाले आहे; पण या लोकांबरोबर संपर्क टिकवून ठेवण्यात आपल्या राजकीय निर्णय समितीचे निमंत्रक म्हणून वामनरावांनी जे हलाहल पचवले, ते मलासुद्धा पचवणे भाग आहे. जर त्यांच्याशी पटत नसेल तर त्यांना दुरुस्त करण्याचा आपला कार्यक्रम चालू झालेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा युतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कानात शरद जोशींचे, शेतकरी संघटनेचे विचार गेले आहेत. या कर्जमुक्तीबद्दल ते हयगय करू लागले, तर त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यात, आपला एकही आमदार नसताना, निवडणूक लढविण्याची आपली तयारी अगदी कमकुवत असताना आपल्याला फारसे यश मिळवता येईल अशी शक्यता नाही. तेव्हा विधानसभेमध्ये आपले निदान पाचदहा सदस्य गेले, तर त्यांच्यामध्ये आपण मतपरिवर्तन घडवून आणण्याची शक्यता वाढेल.
 चर्चाच्या या प्रक्रियेत सोसलेली सगळी दुःखे काही वामनरावांनी आपल्यासमोर उघड केली नाहीत. एकदा युतीच्या नेत्यांनी दिलेल्या निरोपाप्रमाणे वामनराव आपल्या समितीसदस्यांसह मुंबईला जाऊन थांबले. ज्यांच्याशी बोलणी करायची ते आधीच कोल्हापूरला निघून गेले होते, तिथे करवीरच्या त्यांच्या उमेदवाराची घोषणा करून आले. मग, मी वामनरावांना सांगितले, की तुम्ही ताबडतोब मुंबई सोडा, आपली माणसे कोणासाठीतरी ताटकळत राहिलेली आपण सहन करू शकत नाही. ते मुंबई सोडून आंबेठाणला येऊन थांबले. या सगळ्या प्रक्रियेत लक्षात आले, की गेले काही दिवस शिवसेना बोलण्याची चालढकल करीत आहे आणि ही बोलणी न होण्याची शक्यताही आहे. तेव्हा युती ठेवायची का मोडायची, हा विचार करण्यापूर्वी युती टिकून राहण्याची शक्यता आहे का ते पाहायला हवे. अजून त्यांचे निमंत्रण आपल्याला आलेले नाही. वर्तमानपत्रांवरून कळते, की ते आपल्याबद्दलचा निर्णय १७ सप्टेंबरला करू म्हणतात. म्हणजे

पोशिंद्यांची लोकशाही / २८६