पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतील, त्या मतदारसंघामध्ये जाऊन, मी स्वतः त्यांचे कौतुक करीन. लक्ष्मीमुक्ती केली, तर तुमच्या गावात येईन म्हटले तर दोन हजार गावांमध्ये लक्ष्मीमुक्ती झाली; पण, दहा हजार सदस्य नोंदवा म्हटले तर फक्त तीन मतदारसंघांत ते उद्दिष्ट पूर्ण झाले.
 मला प्रामाणिकपणे असे म्हणायचे आहे, की कोणाला फुटून जायचे असेल तर फुटून जाऊ द्या; पण एकदा का एक निर्णय चर्चाविनिमयानंतर झाला, की तो सगळ्यांनी अमलात आणला पाहिजे. दर निवडणुकीच्या वेळी आपण जो निर्णय घेतला, त्याबद्दल शिव्या देणारे कोणी ना कोणी तरी निघालेच. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी घ्यावयाच्या भूमिकेसंबंधी नागपूरला जी बैठक झाली, तीत, काही झाले तरी काँग्रेसबरोबर युती होत कामा नये असे ठासून सांगणारांपैकी एक जण शिव्या देणारा निघालाच. का तर म्हणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झालेच कसे? निवडणुका आल्या म्हणजे काय होईल ते होवो, लढवून तर पाहू असे म्हणायला निवडणूक म्हणजे काही लॉटरी नाही.
 या निवडणुकीत आपण युतीपासून वेगळे झालो, तर काय होईल सांगता येत नाही. बहुतेक काँग्रेस निवडून येईल किंवा कदाचित, काँग्रेस नाही, युतीही नाही, तिसरीच एखादी फळी निवडून येण्याची शक्यता आहे आणि अशाही परिस्थितीचा फायदा घेण्याकरिता स्वबळावर निदान १५ आमदार निवडून आणण्याची आपली ताकद आहे काय? पन्नास काय शंभर उमेदवार उभे केले; तरी हे जमेल असे वाटत नाही; विश्वनाथ प्रताप सिंहांची मदत असताना आपल्याला हे जमले नाही.
 मग, कोणत्या आधाराने आपण वीरश्रीच्या गर्जना करतो आहोत? आपले उमेदवार जिंकून आणू असे म्हणणाऱ्यांचा मी काही राग करीत नाही, मी फक्त एवढेच म्हणतो, की आमचा पहिलवान अजून जरा कच्चा आहे; एवढी मोठी कुस्ती त्याला झेपायची नाही. स्वतंत्र भारत पक्षाचे शंभरावर आमदार निवडून यावेत, असे मलाही वाटते; पण ते या निवडणुकीत जमणार नाही, कदाचित् पुढच्या, पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीत आपण ते करून दाखवू शकू; पण त्यासाठी डोंगर चढताना जसे एकएक पाऊल अभ्यासपूर्वक टाकायचे असते तसे टप्प्याटप्प्याने पुढे जायला हवे. तेव्हा आता पहिले पाऊल कोणते उचलायचे यासंबंधी आपल्याला इथे निर्णय करायचा आहे.
 काँग्रेस निवडून आली, तर काय करायचे? सरळ आहे - आपण जे करीत आलो तेच करायचे; पुन्हा आंदोलने. तेव्हा युतीपासून आपण वेगळे झालो

पोशिंद्यांची लोकशाही / २८५