पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणणे ऐकतात, समजावून घेतात, या भावनेपोटी तुमच्यासारख्याच उमेदीने जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रेमाचे मतांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रत्येक वेळी मला हार पत्करावी लागली. सत्य परिस्थिती समोर असलीच पाहिजे. हिंगणघाट मतदारसंघातून जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, शेतकऱ्यांचे मान्यवर नेते शरद जोशी यांना हरवणारा होता आपल्या स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या बायकोला पळवून नेऊन विकणारा गुंड ! काय केले त्या वेळी शेतकऱ्यांनी?
 आठ वर्षांपूर्वी नांदेड मतदारसंघातून मी लोकसभेसाठी उभा राहिलो. कोणाही कार्यकर्त्याने कसूर केली नाही, जास्तीत जास्त प्रयत्न केले. मला माझी अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्या वेळी शेतकऱ्यांनी जर मला लोकसभेत पाठवले असते, तर आज हिंदुस्थानचा इतिहास वेगळा असता.
 शेतकऱ्यांच्या संख्येच्या ताकदीचे मतांमध्ये परिवर्तन करायला आपल्याला जमले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न असले, दुःख असले, की शरद जोशी म्हणजे तारणहार; पण निवडणूक आली म्हणजे 'शरद' नाव चालते; पण 'जोशी' आपल्या जातीचा नाही याचा प्रभाव परिणामकारक ठरतो. शेतकरी समाजाच्या मानसिकतेचे हे निदान मी काही पहिल्यांदाच करीत नाही. मार्क्सने म्हटले आहे, की शेतकऱ्यांची संघटना ही बटाट्याच्या पोत्यासारखी आहे, एका पोत्यात कितीही बटाटे घातले; तरी ते कधी एकजीव होत नाहीत, पोतं म्हणून ते कधी लढत नाही, बटाटे म्हणून वेगळे वेगळेच राहतात. त्यामुळेचे प्रत्येक निवडणुकीत आपण मार खाल्ला. एका निवडणुकीत आपण असे म्हटले, की या निवडणुकीत एकच उमेदवार आहे तो म्हणजे कर्जमुक्ती. तेव्हाही कर्जमुक्ती या उमेदवाराला मते मिळाली नाहीत.
 हा सगळा अनुभव लक्षात घेतला, तर गेल्या २५ वर्षांत जी काही शेतकरी संघटना उभी राहिली, ती भुईसपाट होण्याचा धोका निर्माण करणारा निर्णय मी या वयात घेऊ शकत नाही. राणा प्रताप आपल्या चेतक घोड्यावरून भरधाव वेगाने दरीवरून उडी मारताना आपली घोडी इतकी लांब उडी मारू शकेल याची खात्री असेल, तरच तसे करीत असे. या वेळी तशी उडी मारण्याचा निर्णय घ्यायच्या वेळी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून तुमची घोडी ही दरी उडी मारून पार करेल असा काही मला विश्वास वाटत नाही.
 तीन वर्षांपूर्वी वामनराव आणि मी अशी चर्चा झाली, तेव्हा मी म्हटले, की तुम्हाला वाटते ना, की राजकारणात पुढे जायला पाहिजे; तर मग आपण परीक्षा पाहूया. ज्या ज्या मतदारसंघामध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे दहा हजार सदस्य

पोशिंद्यांची लोकशाही / २८४