पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही अशी तक्रार करणारे काही कार्यकर्ते बोलले. अजूनही काही कार्यकर्त्यांची बोलण्याची इच्छा बाकी आहे; पण वेळेअभावी आता या भाषणांना आवर घालावा लागत आहे.
 प्रत्येक बैठकीत शेवटी मला उठावं लागतं, त्याप्रमाणे आताही उठलो आहे. बैठकीच्या विषयावर निर्णय घेणे कठीण का आहे, ते प्रथम सांगतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती समोर आहे. पूर्वीच्याच पद्धतीने जर मला निर्णय घ्यायचा असता, तर मी असे म्हटले असते, की दुसऱ्या कोणत्यातरी पक्षाचा बडेजाव स्वीकारण्यापेक्षा आपण आपल्या पायावर चालण्याचा निर्णय घ्यावा. आपल्या पायावर चालताना, जो काही जयपराजय असेल, तो आपला स्वतःचा असेल, दुसऱ्याचा पट्टा आपल्या गळ्यात अडकवून घेऊ नये; पण आता २० वर्षांपूर्वीचा बेदरकारपणा दाखवता येत नाही. गेली दोनतीन वर्षे या राजकीय प्रक्रियेमध्ये वामनराव आणि इतर कार्यकर्त्यांशी मी रस्सीखेच खेळतो आहे. शेतकरी संघटनेने आंदोलने करीत राहावे; निवडणुका, राजकीय सत्ता यांमध्ये फारसे जाऊ नये; राजकीय सत्ता ज्याच्याकडे येते तो खुर्चीवर बसला, की शेतकऱ्याकडे पाहत नाही आणि जर का आपण निवडणुकीच्या राजकारणात गेलो, तर निवडणुका आल्या, ढोल वाजू लागले, की सगळ्यांची डोकी फिरतील आणि जो तो अहमहमिकेने आपापली बाजू मांडू लागतो; त्यामुळे शेतकरी संघटनेची आंदोलन करण्याची ताकद कमी होईल अशी माझी भीती होती. आणि वामनराव व त्यांचे सहकारी यांचे म्हणणे होते, की असे काही घडणार नाही; आपल्याला जर काही पदांच्या जागा मिळाल्या, पाचसहा आमदार झाले तर त्यांच्या ताकदीमुळे विधानसभेमध्ये आपण शेतकऱ्यांची बाजू चांगली मांडू शकू, एवढेच नव्हे तर त्यांच्या आधारावर आपली आंदोलन करण्याची शक्तीसुद्धा वाढेल. त्यामुळे, सटाण्याला झालेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या ठरावाप्रमाणे राजकीय निवडणुका लढवायच्या आहेत, त्या पदे मिळविण्याकरिता नाहीत, तर शेतकरी संघटनेचे आंदोलन प्रभावी करण्याकरिता हत्यार म्हणून लढवायच्या आहेत. वामनरावांनी सांगितले, की आपण हा एक प्रयोग करू; लोकांना निवडणुका लढवायला हळूहळू तयार करू.
 मागे वळून थोडे आत्मपरीक्षण करायला हरकत नसावी.
 गेल्या २५ वर्षांमध्ये माझा सगळ्यांत मोठा पराभव जर कोणी केला असेल तर तो शेतकरी समाजाने केला आहे. लाखालाखांनी शेतकरी माझ्या सभेला जमतात; माझ्या शब्दाखातर हजारोंनी शेतकरी तुरुंगात गेले; पण, लोक माझे

पोशिंद्यांची लोकशाही / २८३