पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निवडणुका जिंकणारे. त्यांच्यात शेतकरी संघटनेच्या खुल्या व्यवस्थेच्या विचाराला पाठिंबा देणारे, पंतप्रधान मनमोहन सिंह वगळता, कोणी नाही.
 अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे तिचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
 स्वराज्य मिळाले. म. गांधींना बाजूला टाकून नेहरूंनी समाजवाद आणला आणि लायसन्स-परमिट-कोटा राज तयार केले. कोणाला काहीही करायची परवानगी नाही, पण, ज्याच्याकडे वशिला आहे आणि ज्याच्याकडे, हात ओले करायला, पैसा आहे त्याला कशाचीही बंदी नाही. अशा तऱ्हेच्या व्यवस्थेला समाजवाद नाव दिले. अशी व्यवस्था कार्यक्षमतेने चालू शकत नाही, स्पर्धेच्या वातावरणात ती टिकू शकत नाही, ती पडणार हे निश्चित होते. त्यानुसार हिंदुस्थानातील नेहरुप्रणीत समाजवादी व्यवस्था पडली आणि रशियातील समाजवादाचेही पतन झाले.
 नेहरूंनी गांधीवादाऐवजी समाजवाद आणला. तो समाजवाद पडला तेव्हा, पुढे काय यावर विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची बौद्धिक कुवत देशातील राजकीय नेत्यांमध्ये नव्हती. त्यांना असे वाटायला लागले, की शेतकरी, उद्योजक, व्यापारी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या हिमतीवर प्रगती करण्यास समर्थ नाहीत. लोकांची प्रगती व्हायची असेल, तर ती सरकारी कार्यक्रमातूनच होऊ शकते असा, शेतकरी संघटनेच्या नेमका उलटा, विचार सगळीकडे पसरू लागला. खरोखरीच जर लोकांचीही भावना असेल, की समाजवाद पडला असला, तरी जी काही प्रगती व्हायची ती सरकारी कार्यक्रमांनीच शक्य होईल, तर त्याचा अर्थ हिंदुस्थानला भविष्य नाही असाच होईल.
 वर्तमानकाळात आनंद नाही आणि भविष्यात आशा नाही अशा अवस्थेत लोक काय करतात? उदाहरणार्थ, गावचा पाटील घ्या. आता घरामध्ये खायला भाकरी नाही अशी अवस्था; पण गावाततर मान सांगायचा आहे. मग तो 'आमचं खानदान केवढं मोठं, पाटील घराणं केवढं मोठं' असं आपल्या पूर्वजांचे कौतुक सांगत मिशीला तूप लावून मिरवतो.
 ज्यांना वर्तमानकाळ नाही आणि भविष्यकाळाबद्दल आशा नाही, ती माणसं नेहमी भूतकाळात रमतात, त्या वेळी आम्ही कसे सुखी होतो, कसे मोठे होतो ते सांगत फिरतात.
 त्याचप्रमाणे हिंदुस्थानची ही परिस्थिती झाली आहे. वर्तमानकाळ नाही आणि भविष्यकाळ नाही म्हटल्यावर लोकांना इतिहासाच्या गप्पा आठवू लागल्या.

पोशिंद्यांची लोकशाही / २७९