पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यात करण्यात आला. वाजपेयींनी हा प्रश्न कुशलतेने बाजूस ठेवला आहे असे प्रचारक जीव तोडून सांगत असताना कार्यक्रमपत्रिकेत या मुद्द्याचा उल्लेख आला ही निवडणुकीच्या यशाच्या दृष्टीने मोठी दुर्दैवी गोष्ट झाली.
 ४. वाजपेयीअडवानींची वाखाणणी करताना त्यांच्या ४० वर्षांच्या तपस्येचा उल्लेख वारंवार झाला. त्याच मुद्द्याची दुसरी बाजू म्हणजे भाजपचे आणि सहकारी पक्षांचे बहुतेक नेते निवृत्तीच्या वयापलीकडे कधीच गेले आहेत. त्याउलट, सोनिया गांधी, राहुल, प्रियांका ही तरणीबांड पिढी काँग्रेसने रणधुमाळीत उतरवली. मतदारांच्या लक्षात वाजपेयींचे वृद्धत्व, कदाचित आले नसेल की काय, या शंकेने मतदानाच्या थोडेच दिवस अलीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय नेत्यांना ६५ वर्षांच्या वयानंतर सक्तीची निवृत्ती देण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेचे मनोहर जोशी आणि भाजपचे राम नाईक यांच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असणारच. सर्व देशातील मतदारांना काँग्रेसचे तारुण्य आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जराजर्जरता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पुरस्कर्त्यांनीच उघड करून दाखविली.
 या निवडणुकीत अनेक तरुण नव्या दमाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आणि अनेक वृद्ध आणि वृद्धा घरी बसल्या. जुन्या नेतृत्वाचा मतदारांना आलेला वीट ही वास्तविकता आहे. पण, डॉ. मनमोहन सिंह, ज्योती बसू, अडवानी यांच्या वृद्धावस्थेतील तल्लखतेशी तुलना करतील अशी माणसे नव्या पिढीत अजूनही दिसत नाहीत. वय कमी म्हणजे तडफ अधिक असा काही नियम नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कोणी हा मुद्दा उठवणे आत्मघातीच होते.
 ५. रालोआच्या महाराष्ट्रातील बहुतेक नेत्यांना लोकसभेच्या निवडणूक प्रचारात काय बोलावे हाच मोठा प्रश्न पडला होता. त्यांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कारभारातील त्रुटी, भ्रष्टाचार, तेलगी प्रकरण, लेन आणि सेन प्रकरण यांच्यावरच वक्तृत्व गाजवले. सगळ्या वक्त्यांनी तेच ते कोटिक्रम आणि विनोद ऐकवल्याने मतदारांना जांभया देण्यापलीकडे गत्यंतरच नव्हते.
 ६. निवडणूक आपण जिंकल्यातच जमा आहे अशा गुर्मीत महाराष्ट्रातील अनेक प्रचारकांनी ताल सोडून भाषणे केली. भाषणाच्या सुरुवातीला शिवरायांना वंदन केले, शिवसेनाप्रमुखांना वंदन केले म्हणजे नंतर काहीही शिवराळ बोलले तरी चालते अशी त्यांच्यातील अनेकांची समजूत दिसली. अनेक ठिकाणी अशी भाषा वापरली गेली, की ज्यामुळे श्रोतृवर्गातील महिलांना अवघडल्यासारखे

पोशिंद्यांची लोकशाही / २६९