पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रान करून तापत्या उन्हाळ्यात दिवसरात्र फिरलो. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांचा संपर्क झाला. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. काही किरकोळ अपवाद सोडल्यास शेतकरी संघटनेचे सारे कार्यकर्ते एकजुटीने आणि एकदिलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराकरिता राबले. त्यांच्या निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची वाखाणणी सर्व उमेदवारांनी केली आहे.
 मतदाराचा निर्णय हा लोकशाहीत शिरसावंद्य मानावाच लागतो. 'ही कसली लोकशाही?' असा प्रश्न विचारणे हे निव्वळ कोतेपणाचे लक्षण आहे. या प्रचाराच्या काळात काही गोष्टी घडल्या त्या त्याही वेळी मला खटकल्या होत्या. त्यासंबंधी नापसंती मी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनाही सांगितली होती. आता त्यांची मांडणी अशाकरिता करतो, की ज्या गोष्टी मला खटकल्या त्यांनी मतदार चांगलाच दुरावला असणार. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाडावाची काही चिन्हे ही निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही दिसू लागली होती. किंबहुना, अशा घटनांनीच अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला तडा गेला. माणसाच्या मनातील आदर्श मूर्तीला लहानसा जरी टवका गेला, तरी ती मूर्ती पूजेची राहत नाही, भावनेला तडा जातो. असे काहीसे वाजपेयींच्या बाबतीत घडले आहे. त्यातले काही अनवधानाने घडले असेल, काही जाणूनबुजून स्वार्थापोटी किंवा खोडसाळपणे केले असेल. अशा कारणांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला हार घ्यावी लागली असे म्हणणे कदाचित तर्कशुद्ध असणार नाही. पण, अशा गोष्टी भविष्यात टाळल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीस पुन्हा एकदा काँग्रेसवर मात करून सत्तेवर येता येईल. लोकसभेतील दोन जागांवरून २०० च्या वर जागांपर्यंत जाणाऱ्या पक्षाला १२९ पासून सुरुवात करणे फारसे जड जाऊ नये.
 पहिली सलामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी येत्या सहा महिन्यांतच होणार आहे.
 काय चुकले, कसे सुधारायचे?
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडणूक प्रचाराची रणनीती इतकी भुईसपाट का झाली? मतदारांसमोर जाताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे काही सज्जड भांडवल होते.
 १) 'दहा वर्षांत ६ पंतप्रधान' अशा राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीतून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राजकीय स्थैर्याची पुरी ६ वर्षे देशाला दिली.
 २) भाजपकडे किमान बहुमतही नव्हते. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एकेक पक्षाची जुळवणी करीत करीत, अखेरीस समान कार्यक्रमाच्या आधारावर

पोशिंद्यांची लोकशाही / २६५