पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आघाडीत स्वतंत्र भारत पक्ष सामील झाला (५ मार्च २००४). त्या दिवसापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत येईल, अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनतील याबद्दल सर्व राजकीय जाणकार, चाचणी मतदानाचे निष्कर्ष, भविष्यवेत्ते, एवढेच नव्हे तर अगदी नेहमी अचूक ठरणारे सट्टावालेसुद्धा १२ मे २००४ च्या मध्यरात्रीपर्यंत या विषयावर एकमत होते. १३ मेचा दिवस उजाडला आणि एका राजकीय भूकंपाने देश हादरला. आता सोनिया गांधी पंतप्रधान बनतील. हे सगळे कसे झाले याचे विश्लेषण आकडेवारीच्या आधाराने करणे आज कठीण आहे. काही ढोबळ निष्कर्ष आजही काढता येतील.
 १) पंतप्रधानपदासाठी स्वदेशी जन्म असलेला नागरिकच पाहिजे, ही कल्पना मतदारांनी झुगारून दिली आहे.
 २) मतदारांचा कौल सर्व राज्यांत सारखा नाही. आंध्र प्रदेशात तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरुद्ध गेला, तर पंजाबात, कर्नाटकात आणि ओरिसात तो काँग्रेसच्या विरोधात गेला. हरियानात चौतालांचे पानिपत झाले. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांत काँग्रेस पुढे आली. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांत काँग्रेसला विजय मिळाला. दक्षिण महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातही उसाच्या भावासंबंधीचे आंदोलन दोन वर्षे उग्रपणे चालूनही काँग्रेसची सहाही मतदारसंघांत सरशी झाली. याउलट, विदर्भातील ११ पैकी १० आणि मराठवाड्यातील ८ पैकी ६ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीस मिळाल्या. विदर्भ आणि मराठवाड्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे यश हे स्वतंत्र भारत पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मिळाले आहे, हे सर्वजण मान्य करतात. काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळ्या तेलंगणाला मान्यता दिली, तशी वेगळ्या विदर्भालाही दिली असती, तर परंपरेने काँग्रेसनिष्ठ विदर्भ काँग्रेसवर उलटला नसता असे भाष्य काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी केले आहे. या भाष्यात काही तथ्य असेल, तर मराठवाड्यात काँग्रेस भुईसपाट का झाली याचेही उत्तर द्यावे लागेल. मराठवाड्यात तर काही वेगळ्या मराठवाड्याचा प्रश्न अजून उठवण्यात आलेला नाही?
 सारांश, मतदानाच्या आकडेवारीची विधानसभा मतदारसंघवार, लोकसभा मतदारसंघवार, राज्यवार, प्रदेशवार तपासणी केल्यानंतरच या निवडणुकीच्या कौलाचा व्यावहारिक अर्थ स्पष्ट होईल. त्यासंबंधी अभ्यास यथावकाश होतीलच.
 गेल्या दोन महिन्यांत मी स्वतः आणि शेतकरी संघटनेचे, स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता जिवाचे

पोशिंद्यांची लोकशाही / २६४