पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'मंडल'मार्ग स्वीकारला. तेव्हापासून भारतात इतिहासातील गौरवस्थळांचा भांडवल करणारे आणि इतिहासातील अन्यायांचे भांडवल करणारे असे दोन प्रवाह तयार झाले. मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव, कांशीराम, मायावती, एन.टी. रामाराव, चंद्राबाबू, करुणानिधी, जयललिता, पासवान हे सगळे जातीच्या व प्रदेशांच्या आधारांनी ऐतिहासिक जखमांचे भांडवल करणारे. याउलट, भाजप, शिवसेना, अकाली दल, संघ परिवार, विहिंप, बजरंग दल असे सगळे इतिहास व पुराणकालीन अभिमानस्थळांच्या आधारांनी आर्थिक विषयपत्रिका हाताळू पाहणारे.
 सांगलीच्या शेतकरी मेळाव्यात (१९८७) विश्वनाथ प्रताप सिंहांच्या हजेरीत 'शेतकऱ्यांच्या उगवत्या स्वातंत्र्याभोवती भगवी, हिरवी, पिवळी, निळी गिधाडे घिरट्या घालीत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा,' अशी धोक्याची सूचना मी दिली होती. या गिधाडांचा एक अग्रदूत सभेच्या मंचावरच बसला होता, हा मोठा विचित्र योगायोग आहे! काँग्रेस पक्षाने यांतील फक्त भगव्या गिधाडांनाच जातीयवादी मानले, बाकीच्या जातीयवादी गिधाडांना मात्र काँग्रेस पक्ष सोयीप्रमाणे दूर-जवळ करीत असतो.
 १३ दिवसांचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले आणि काँग्रेसने पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. तेव्हापासून स्वतंत्र भारत पक्ष भाजपबद्दलची आपली भूमिका तपासून घेऊ लागला. (शेतकरी संघटक : ६ जून १९९६) राजकारणात काही पक्षांना अस्पृश्य मानल्याने नुकसान देशाचे होते. अशा पक्षांना मध्यप्रवाहात आणण्याची आवश्यकता असते. या आडाख्याने पुढे स्वतंत्र भारत पक्षाने दोन पावले उचलली. भाजपचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांनी मुसलमानांनी भाजपात प्रवेश करावा असे आवाहन केल्यानंतर शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्या आवाहनाच्या गांभीर्याची तपासणी केली. त्या पक्षात इतर कोणत्याही पक्षांच्या तुलनेने मुसलमानांना कमी सन्मानाची वागणूक दिली जात नाही, हे स्पष्ट झाले.
 कृषी कार्यबलाच्या अध्यक्षपदाचे निमंत्रण मी स्वीकारले आणि आपल्या पक्षातील स्वदेशीवादी अतिरेक्यांना आटोक्यात ठेवण्याच्या अटलबिहारी वाजपेयींच्या क्षमतेचीही परीक्षा केली.
 अभिमानस्थळे गौरवणारे अतिरेकी आणि राष्ट्राभिमानाच्या वल्गना करीत बंदिस्त अर्थव्यवस्था पुरस्कारणारे 'स्वदेशी' अतिरेकी, या दोघांनाही काबूत ठेवून, आघाडीचे शासन पूर्ण काळ टिकविणाऱ्या, त्याबरोबर देशाला राजकीय स्थैर्य आणि आर्थिक महासत्ता बनण्याचीही आकांक्षा देणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही

पोशिंद्यांची लोकशाही / २६३