पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण, त्याबरोबर आंध्र प्रदेशात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे कार्यक्रमही जाहीर करावे लागतील. आर्थिक धोरणांतील या विसंगतींचा फायदा स्वतंत्रतावाद्यांना उठवावा लागेल. सैद्धांतिक स्वतंत्रतावादाऐवजी स्वतंत्रतावादाची रणनीती तयार करावी लागेल.
 नवी समीकरणे
 समाजवादाचा पाडाव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष, संघ परिवार, शिवसेना आदी हिंदुत्ववादी पक्षांना बरे दिवस यावेत यात आश्चर्यकारक काहीच नव्हते. समाजवादाच्या काळात नियोजनाच्या अर्थव्यवस्थेने देश गरिबीच्या पंजातून सुटेल आणि पुढेमागे कधीतरी विकासाच्या रस्त्याने झेप घेईल अशी आम नागरिकांची धारणा झाली होती. समाजवादाच्या पाडावानंतर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांबद्दल निराशेचे सावट आल्यामुळे इतिहासातील मानबिंदूंची जपणूक आणि 'उदे उदे' करणारी विचारधारा पुढे येईल हे अपेक्षितच होते. बेकारीच्या खाईत सापडलेल्या तरुणांना भूतकाळाततरी आपण कोणी होतो, ही जाणीव सुखकारक वाटली. आम्ही सर्व जगाकडून हार खाल्ली असेल; पण आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत, जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मांडणाऱ्या हिंदू धर्मात आमचा जन्म झाला, पुरुषोत्तम प्रभुरामचंद्रांचा आम्ही आदर्श मानतो अशी अभिमानस्थळे फडकावणाऱ्यांचा तोटा कधीच नव्हता. समाजवादाबरोबर आर्थिक विषयपत्रिका संपुष्टात आली आणि युद्ध हरलेल्या सैन्याप्रमाणे जनता सैरावैरा धावू लागली आणि त्यांनी अशी पुरातन अभिमानस्थळे फडकावणाऱ्यांचा आश्रय घेतला. १९८५ च्या सुमारास मला प्रमोद महाजन भेटले होते. त्यांच्याशी बोलताना 'भारतात हिंदुत्वाची लाट येऊ लागली आहे,' असे भाकीत मी सांगितले होते. त्यांच्या एका लेखात महाजनांनी ही आठवण नोंदवली आहे. त्यापुढे जाऊन, मी आणखी एक भाकीत सांगितले, 'या हिंदुत्वाच्या लाटेचा फायदा तुम्ही हिंदुत्ववादी उठवू शकणार नाही,' या दुसऱ्या भाकीताचीही नोंद त्यांच्या लेखात आहे.
 आणीबाणीनंतर हिंदुस्थानातील राजकारणाची सारी घडीच विस्कटून गेली. विश्वनाथ प्रताप सिंह दुसऱ्या स्वातंत्र्याची भाषा करीत होते, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन देत होते. प्रत्यक्षात पंतप्रधान झाल्यानंतर आघाडी शासनांच्या कसोट्यांना ते उतरू शकले नाहीत आणि ऐतिहासिक अभिमानस्थळांचे भांडवल भारतीय जनता पक्ष यांसारखे पक्ष करीत असताना, त्याला छेद देण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक दुःखांचे, अपराधांचे आणि अन्यायांचे भांडवल करून

पोशिंद्यांची लोकशाही / २६२