पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





२००४ निवडणुकीने काय शिकविले?


 स्वतंत्रतावाद्यांपुढे नवे आव्हान
  १४ व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. सर्व निकालही जाहीर झाले आहेत. हा लेख प्रकाशित होईपर्यंत, देशाच्या नव्या पंतप्रधान सोनिया गांधी, झालेल्या असतील.
 २००४ च्या या निवडणुकांत १९५२ सालच्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच 'निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार,' याची सर्वमुखी मान्यता या वेळी होती असा प्रचार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे कार्यकर्ते प्रचारक - त्यात स्वतंत्र भारत पक्षाचे नेतेही आले - करीत होते. लोकांच्या अनुमानाप्रमाणे १९५२ च्या निवडणुकीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले; २००४ सालच्या निवडणुकीत मात्र अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले नाहीत. उलट, त्यांच्या पक्षाने ज्यांची विविध तऱ्हांनी अवहेलना आणि उपहास केला त्या सोनिया गांधी पंतप्रधान होत आहेत.
 या निकालांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांनाही सुखद धक्का बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठीराख्यांना वज्राघात झाल्यासारखी तिरीमिरी आली आहे.
 आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांत काँग्रेसचा सफाया झाला. दस्तुदखुद्द इंदिरा गांधीही हरल्या. त्या वेळी अशा सुखद धक्क्याचा अनुभव काँग्रेस विरोधकांना मिळाला होता. त्या वेळी निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रे नव्हती. त्यामुळे निकाल संध्याकाळी यायला सुरुवात झाली, ते दुसरे दिवशी सकाळपर्यंत निकाल येत राहिले. त्या वेळी दूरदर्शनचाही फारसा प्रसार नव्हता. सर्वसाधारण लोक रेडिओवरच बातम्या ऐकत. दर पाच-दहा मिनिटांनी काँग्रेसचा कोणता ना कोणता मोहरा पडल्याची बातमी येई आणि एकाच रेडिओभोवती जमलेल्या

पोशिंद्यांची लोकशाही / २५९