पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक महासत्ता होईल. एवढंच नव्हे, तर हिंदुस्थानातील प्रत्येक माणसाकडे जगामध्ये मोठ्या आदराने पाहिलं जाईल. आकडेवारी बाजूला ठेवा, उत्पन्नाचे आकडे नकोत, रोजगारीचे आकडे नकोत, बेरोजगारीचेही आकडे नकोत; अर्थशास्त्रात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातील पुढे जाण्याची भावना. ही भावना अटलबिहारी वाजपेयींनी देशात जागवली. त्याचं रहस्य - सगळ्यांना बरोबर घेऊन चाला, सगळ्यांना समजून घ्या, उगाच खोटेपणाचा दंभ ठेवू नका असा खुलेपणा. या वृत्तीचा नेता इतिहासात शोधायचा ठरवले, तर मला फक्त अमेरिकेतील अब्राहम लिंकनच सापडतात.
 अटलजींचं इतकं परीक्षण केल्यानंतर माझी खात्री झाली, की तेच जर पंतप्रधान राहिले तर शेतकऱ्यांचं आणि शेतकरी संघटनेचं भाग्य सुरक्षित राहील. सूर्याच्या रथाला सात घोडे आहेत आणि त्यांना सापांचे लगाम आहेत, त्याच्या सारथ्याला पाय नाही असा संस्कृतात श्लोक आहे; पण त्याच्याही पेक्षा कठीण परिस्थिती वाजपेयींच्या रथाची होती. त्यांच्या रथाला सात नव्हे २४ घोडे होते, वेगवेगळ्या दिशांनी रथ ओढण्याचा प्रयत्न करणारे, लगाम नाहीतच; पण सारथ्याने आपल्या अंगी असलेल्या सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता यांच्या साहाय्याने तसेच जे जे नवे समोर येईल - तंत्रज्ञान, राजकीय विचार - त्या सगळ्यांबद्दल एक सैद्धांतिक स्वच्छता बाळगून, त्यांचा स्वीकार-अस्वीकार करीत, हा रथ ६ वर्षे यशस्वीपणे आणि प्रगतीच्या दिशेने चालविण्यात यश प्राप्त केले. अटलजींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान आज खरोखरच महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे.
 या परिस्थितीमध्ये आता मतदारांनी/शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मी प्रचाराकरिता आलो आहे, हे खरे आहे; पण मी सांगतो म्हणून अमक्याला मते द्याच, असे मी सांगणार नाही.
 कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू व्हायच्या ऐन वेळी अर्जुनाने धनुष्य खाली ठेवले तेव्हा कृष्णाने त्याला म्हटले, की काहीतरी मूर्खासारखे करू नकोस, तुला युद्ध करावे लागणारच आहे. पण, त्यानंतर गीतेचे १८ अध्याय सांगून झाल्यानंतर कृष्ण अर्जुनाला म्हणाला, "मला जे काही तत्त्वज्ञान अवगत होतं, ते तुला सांगितलं. आता, यथेच्छसि तथा कुरू।" तसं, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, यथायोग्यता आणि परिणाम याबाबतची सविस्तर मांडणी मी तुमच्यासमोर केली आहे. आता तुम्ही तुमच्या मनातल्या देवाला विचारा, तुमच्या मनातल्या राष्ट्रभक्तीला विचारा,

पोशिंद्यांची लोकशाही / २५७