पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वाभिमान आणि कोते अहंकार बाळगणं चुकीचं आहे असं ते मानतात आणि त्याप्रमाणे वागतात, ही अटलबिहारी वाजपेयींची जादू आहे. त्यांचं नेतृत्व हे सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. विरोध करणारांना समजावून सांगणे आणि त्यांच्याबद्दल मनात आकस न बाळगणे, हे त्या नेतृत्वाचे विशेष गुण आहेत. हिंदुत्वाची मुळामध्ये व्याख्याच अशी आहे, की हिंदुत्व हे कधी कोतं नसतं, हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि सहिष्णू असतं. जे लोक हिंदू म्हणून जन्माला आल्याबद्दल अभिमान बाळगतात आणि दुसऱ्या धर्मात जन्मलेल्या लोकांचा रागद्वेष करतात, त्यांना सांगायला पाहिजे, तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात, भाग्यवान आहात, अभिनंदन. तुम्ही काही कोणाकडे अर्ज करून, हिंदू जन्म मिळवलेला नाही. तुमची आई हिंदू, वडील हिंदू म्हणून तुम्ही आपसूकच हिंदू झालात. त्यात तुमचं कर्तृत्व काय? तेव्हा त्याचा काही अभिमान बाळगू नका आणि तुमच्यासारखं भाग्य न लाभल्यामुळे अन्य धर्मांत जन्मलेल्यांचा राग करू नका. जे लोक हिंदुत्व अतिरेकी करायचा प्रयत्न करतात, ते खऱ्या अर्थाने, हिंदूच नव्हेत; संपूर्ण देशात खरा हिंदू असेल, तर ते सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता बाळगणारे अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव आहेत.
 आणि म्हणून ते सर्व २४ पक्षांना बरोबर घेऊन चालू शकले, ६ वर्षे सत्ता टिकवली, देश संपन्नतेच्या मार्गावर आणून ठेवला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी सगळ्या पक्षांमध्ये सेतू बांधले, रस्ते बांधून सगळ्या प्रदेशांमध्ये सेतू बांधले, नद्या एकमेकांना जोडण्याची योजना काढून, त्यांच्या दरम्यान सेतू बांधण्याचे प्रयत्न चालवले, टेलिफोनचे सेतू बांधले आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'आपण हिंदुस्थानसारख्या गरीब देशात जन्माला आलो, ही मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे,' अशी तरुण पिढीमध्ये तयार झालेली नैराश्याची भावना पुसून काढून, हिंदुस्थानातील माणसे बुद्धिमान आहेत, प्रज्ञावान आहेत, प्रतिभावान, वैज्ञानिक आहेत... त्यांच्या कर्तृत्वाला देशातल्या देशात वाव मिळण्यास अनुकूल वातावरण तयार केलं. आतापर्यंत ही सर्व चांगली माणसं अमेरिकेत गेली म्हणजे यशस्वी होतात, हिंदुस्थानात मात्र कुजत पडतात, गरीब राहतात असं होतं. याचं कारण अमेरिकेत त्यांना आपलं कर्तृत्व फुलवायचं जे स्वातंत्र्य आहे ते इथं मिळत नव्हतं. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारनं या देशातील या प्रज्ञावंतांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असं धोरण स्वीकारल्याबरोबर एक चमत्कार घडला आणि हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागलं, की रालोआ सरकारने खुल्या केलेल्या रस्त्याने जर आपण चालत राहिलो, तर हिंदुस्थानसुद्धा

पोशिंद्यांची लोकशाही / २५६