पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेन का कोणी ममता, का कोणी समता, का कोणी जयललिता माझी खुर्ची उडवून टाकील हे मला सांगता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला असं आश्वासन देऊ इच्छित नाही, की जे पुरं करू शकेन किंवा नाही याबद्दल माझ्याच मनात शंका आहे.' इतकं असतानासुद्धा त्यांनी ही २४ पक्षांची आघाडी टिकवून, ६ वर्षे राज्यकारभार केला. ही किमया त्यांना साधली यामागचं रहस्य म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा, विनम्रता आणि सगळ्यांना सामावून, सांभाळून चालण्याची प्रवृत्ती यांत आहे. भाजप या त्यांच्याच पक्षामध्ये स्वदेशी जागरण मंच, किसान संघाचे ठेंगडी यांच्यासारखी माणसं स्वदेशीच्या घोषणा करीत होती आणि अटलजींनी त्यांना इतक्या साध्या शब्दांमध्ये समजावलं, की जो धडा मी शेतकऱ्यांना गेली पंचवीस वर्षे शिकविण्याचा प्रयत्न करतो आहे, तो त्यांनी दोन दिवसांत त्यांच्या गळी उतरवला : 'तुम्हाला राष्ट्राभिमान आहे, तर राष्ट्र सशक्त व्हायला पाहिजे हे तुम्ही मानलं पाहिजे आणि राष्ट्र सशक्त व्हायचं असेल, तर ते लायसन्स-परमिट-कोटा आणि नियंत्रण यांच्या व्यवस्थेने कधी होत नाही. या व्यवस्थेचा अट्टहास धरणाऱ्या रशियाचा पाडाव झाला. तुम्हाला जर देश समर्थ करायचा असेल, तर बाजारपेठ खुली करावी लागेल, प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला वाव द्यायला लागेल. तेव्हाच देश मोठा होईल.' अशा शब्दांत त्यांनी आपल्या लोकांना समजावलं आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये, त्यांच्या पक्षामध्ये इतका विरोध असताना, गेल्या सहा वर्षांमध्ये खंबीरपणे सबंध देश बाजारपेठेवर आधारित खुल्या व्यवस्थेच्या मार्गावर असा आणून ठेवला आहे, की आता तो माघारी वळवणे सोनिया गांधींनासुद्धा शक्य होणार नाही. आणखी एक मुद्दा : त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये जाणूनबुजून, त्यांच्यावर पूर्वी जातीयवादी, हिंदुत्ववादी, अल्पसंख्याकांना त्रास देणारे असे आरोप करीत अशा पक्षांनाही सामावून घेतलं आहे. त्यांच्या पक्षापेक्षाही भडक रीतीने हिंदुत्वाची मांडणी करणारांनाही सामावून घेतलं; पण त्यातही अटलबिहारी वाजपेयींची खासियत अशी, की ज्या विषयांबद्दल वाद होण्याची शक्यता आहे असे राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७० यांसारखे प्रश्न राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यक्रमपत्रिकेपासून बाजूला ठेवले. भाजपच्या जाहीरनाम्यात असले तर असेनात का, त्यांच्यावर नंतर सवडीने विचार करता येईल; पण आघाडीत वाद नकोत. ज्या मुद्द्यावर स्वतःच्या पक्षाने आग्रह धरला होता, ते मुद्दे बाजूला ठेवणं, याला मुत्सद्दीपणा म्हणतात. त्यांनी याविषयी आपलं मत बदललं असं नाही; पण जर २४ पक्षांना सांभाळून, देशाला पुढे नेणारा कारभार करायचा असेल, तर कोते

पोशिंद्यांची लोकशाही / २५५