पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इतरही क्षेत्रांचा विचार करायला पाहिजे. कारण शेतकरी हा केवळ शेतकरीच नाही, तर तो देशाचा महत्त्वाचा नागरिक आहे. त्याने फक्त शेतीचा विचार करायचा, हे युक्त नाही.
 प्रचारसभांमध्ये प्रचाराच्या आवेशात, तारतम्य न बाळगता कोणाचीही कोणाशीही तुलना करतात. ५० वर्षे ज्यांनी देशाच्या सेवेत घालवली, अत्यंत प्रतिभासंपन्न, कविमनाचा, कर्तबगार प्रशासक, उत्कृष्ट वक्ते असे अटलबिहारी वाजपेयी आणि नव्याने राजकारणात उतरलेलं कोणीही यांची तुलना करणं ही काही शहाणपणाची गोष्ट नाही, न्याय्यही नाही. त्यांच्याबरोबर काँग्रेसमधील कोणाची तुलनाच करायची झाली तर त्यातल्या त्यात मजबूत पंतप्रधान म्हणून राजीव गांधींचं नाव घेता येईल. ते सगळ्यांत मजबूत पंतप्रधान होते; कारण त्यांना जे २/३ बहुमत होतं तितकं बहुमत पंडित जवाहरलाल नेहरूंनाही कधी मिळालं नव्हतं.
 दोघांची तुलना आपण करून पाहू.
 १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी कोलकत्त्याहून निघाले, तेव्हा विमानातच त्यांना कळविण्यात आलं की, 'तुम्ही पंतप्रधान व्हावं असं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे, दिल्लीत उतरल्याबरोबर तुमचा शपथविधी व्हायचा आहे.' त्यांना कल्पनाही नव्हती, त्यांनी कधी तसं स्वप्नही पाहिलं नव्हतं, तसे प्रयत्नही केले नव्हते, त्यासाठी आवश्यक तपस्याही केली नव्हती; पण राजीव गांधी पंतप्रधान झाले. पूर्वायुष्यात त्यांनी काही चमक दाखविली होती किंवा काही कर्तबगारी दाखविली होती असे नाही, तरी ते पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं वय चाळिशीच्या आसपास होतं. वय तरुण, तब्येत ठणठणीत आणि लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेतील २/३ खासदार हे त्यांच्या पक्षाचे. म्हणजे त्यांनी म्हणावं आणि देश चालावा अशी परिस्थिती होती; पण त्यांच्या कारभाराचा परिणाम काय झाला? त्यांचं सरकार कसंबसं पाच वर्षे टिकलं आणि त्यानंतर जी पहिली निवडणूक झाली, त्यात काँग्रेसही हरली आणि त्यांचं पंतप्रधानपदही गेलं. म्हणजे ज्यांच्या सगळ्या बाजू मजबूत होत्या त्या राजीव गांधींनी पक्षाचं आणि स्वतःचं किती वाटोळं केलं!
 आता दुसरी बाजू अटलबिहारी वाजपेयींची बघू.
 पन्नास वर्षे देशसेवेची तपस्या केलेला माणूस. पंतप्रधान होऊन, त्यांना ६ वर्षे आणि काही दिवस झाले. १८ मार्च १९९८ ला राष्ट्रपतींनी बोलावून त्यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. त्या वेळी ते म्हणाले, "मी २४ पक्षांचा पाठिंबा घेऊन, आज पंतप्रधान आहे आणि उद्या सकाळी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर

पोशिंद्यांची लोकशाही / २५४