पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


खुलेपणाचा दरवाजा उघणारे 'अटलजीं' चे बटण


 स्वतंत्र भारत पक्ष (स्वभाप) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)त सामील झाला आहे. परिणामी, आतापर्यंत या आघाडीत २४ पक्ष होते त्याजागी २५ पक्ष झाले आहेत. स्वभाप रालोआत सामील होताना देण्याघेण्याची एकही अट घातलेली नाही. महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात कोठेही लोकसभेची जागा न मागता आणि न घेता रालोआतील इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि स्वभापच्या तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात उतरले.
 शेतकरी संघटनेकडे एक वैभव आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी घरची भाकरी खाऊन, अपार कष्ट करून कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पलटनच्या पलटन स्वातंत्र्याकरिता काम करीत होती. स्वातंत्र्य आल्यानंतर ती पलटण गेली आणि त्यानंतर डाकबंगल्यांभोवती घोटाळत राहून तेथे जे पाहुणे येतील त्यांच्याशी ओळख करून घेऊन कोणतेतरी तिकीट - जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समितीचे - मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडू लागली. अशा परिस्थितीत, मला सांगायला अभिमान वाटतो की अगदी लहानात लहान तिकीटाचीसुद्धा अपेक्षा न ठेवता आणि उमेदवाराकडून जेवणाची व्यवस्था व्हावी एवढीसुद्धा अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या शेतकरी कार्यकर्त्यांची पलटन शेतकरी संघटनेकडे आहे. ही पलटन अटलबिहारी वाजपेयींचे हात मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या म्हणजे महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात सर्व शक्तीने उतरली आहे.
 स्वतंत्र भारत पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यावर मला अनेकांनी प्रश्न विचारला की यात शेतकऱ्यांना काय मिळाले?

पोशिंद्यांची लोकशाही / २४९