पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उठवून स्वतःची दुकाने थाटायची आहेत.
 मुसलमानांच्या बाबतीत काँग्रेसने वर्षानुवर्षे निवडणुकीकरिता गठ्ठा मत संपादन करण्याच्या हेतूने तुष्टीकरणाचे धोरण चालवले. त्यामुळे, मुस्लिम समाजाचे सामाजिक, धार्मिक प्रश्न जळते राहिले; आर्थिक प्रश्नांचा विचार झालाच नाही. या धोरणामुळे मुसलमान समाजात समरसतेची भावना तयार झाली नाही आणि परिणामी, क्रिकेट सामन्यासारख्या क्षुल्लक प्रसंगीही मुसलमान समाजात पाकिस्तानी चाहते असल्याची भावना असे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कारकिर्दीच्या सहा वर्षांनंतर भारतातील बहुसंख्य समाजांत एक आत्मविश्वासाची भावना जागृत झाली, तसेच मुसलमान समाजातही पोकळ तुष्टीकरण आणि मुसलमान मतांच्या गठ्याचे राजकारण याबद्दल असंतोष पसरला आहे. फार मोठ्या संख्येने मुसलमान खुद्द भाजपात सामील होताहेत. नजमा हेपतुल्ला आणि अरिफ मोहम्मद यांसारखे व्यासंगी मुसलमानही भाजपकडे वळत आहेत. याउलट, मुलायमसिंग आणि त्यांचा पक्ष यांच्याशीही दोस्ती करणे काँग्रेस आघाडीला जमलेले नाही. ही या नव्या काळाची चिन्हे आहेत. काँग्रेसने मुसलमान प्रश्न जोपासला आणि निवडणुकीसाठी त्याचा फायदा घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ६ वर्षांच्या काळात पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांशी संबंध सुधारले आणि देशातील मुसलमानांतही अलगवाद कमी झाला. भारताची क्रिकेटटीमही कैफ, पठाण यांच्या पराक्रमानेच यशस्वी होते. याच जाणिवेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजराथमध्येही एक नवे सलोख्याचे वातावरण तयार होत आहे.
 पक्षाची धोरणे, देशात घडलेल्या जातीय दंगली, पक्षाचे निवडणुकीतील तिकीटवाटप या कसोट्यांवर वेगवेगळ्या पक्षांची जातीयता तपासून पाहिली तर त्यात काही डावे, उजवे करण्यासारखे दिसत नाही.
 दोन विकल्प
 मतदारांनी निवड करायची आहे, ती दोन विकल्पांतून. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ६ वर्षे अत्यंत बिकट परिस्थितीत टिकून राहिली आहे. आघाडीचे नेतृत्व काळाच्या कठीण कसोटीस निश्चित उतरलेले आहे. गेल्या ६ वर्षांत समाजवादाच्या काळात चैतन्यहीन झालेल्या देशाच्या अचेतन कुडीत प्राण फुकून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एक नवा आत्मविश्वास आणि आशावाद तयार केला आहे. काँग्रेसप्रणीत आघाडीत घटकपक्षांच्या निष्ठांची काहीही खात्री नाही. शरद पवारांसारखे 'स्वामिद्रोहाचा' जुना इतिहास असलेले या आघाडीच्या प्रमुख आधारस्तंभात आहेत. राष्ट्रीय नेतृत्व केवळ घराणेशाहीने चालत आलेले;

पोशिंद्यांची लोकशाही / २४६