पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोंधळाची स्थिती आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष निवडणुकीनंतरही एकत्र राहतील, यात काही शंका नाही. काँग्रेसच्या आघाडीत सामील झालेले पक्ष सोयीपुरते मित्र बनले आहेत. निवडणुकीनंतर त्यांचा निर्णय वेगवेगळा असू शकेल, ही गोष्ट बसपच्या नेत्या मायावती यांनी स्पष्ट केली आहे.
 रा.लो.आ - जातीयवादी आघाडी?
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे आहे. या पक्षाचे घनिष्ठ संबंध हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना यांसारख्या संघटना आणि पक्ष यांच्याशीही त्यांचे संबंध आहेत. भारतीय जनता पक्षाचा उगम जनसंघातून झाला. राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० वे कलम इत्यादी प्रश्न त्यांनी पुढे मांडले. त्यामुळे 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही जातीयवादी आघाडी आहे,' असा आरोप करून काँग्रेसप्रणीत आघाडीने आपल्या आघाडीस 'जातीयताविरोधी आघाडी' असे बिरूद लावून घेतले आहे. 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही जातीयवाद्यांची फळी आहे आणि जातीयताविरोधी सर्व नागरिकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीस हाणून पाडावे,' असा आक्रोश तिने चालवला आहे. या परिस्थितीची तुलना पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसच्या स्थितीशी करणे उपयोगी ठरेल. म. गांधींची काँग्रेस स्वतःला अखिल भारतातील सर्व जातिधर्मांच्या लोकांची प्रतिनिधी समजत असे. महंमद अली जीना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मात्र काँग्रेस हा हिंदूंचा, त्यातल्या त्यात सवर्ण हिंदूंचा पक्ष आहे असा आरोप करीत.
 राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रतिवाद साधा आणि सरळ आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वसमावेशक आहे. त्यात समता पक्षही आहे, तृणमूल काँग्रेसही आहे, शिवसेनाही आहे, तेलगू देशम् ही आहे आणि आता, स्वतंत्र भारत पक्षही आहे. खुद्द भाजपातसुद्धा कोणाही धर्माजातीच्या लोकांना प्रवेशास बंदी नाही. काही वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी तर मुस्लिम समाजाच्या लोकांना भाजप प्रवेशाचे जाहीर निमंत्रण दिले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत झाले. भाजपला जातीयवादी म्हणून हिणवणाऱ्या पक्षांनी जातीयवाद कायमचा संपवण्यासाठी बिगर हिंदूंचा भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश घडवून आणला असता, तर भाजपला जातीय म्हणण्याचे काही कारणच राहिले नसते. भारतातील अनेक तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी नेत्यांना आणि विचारवंतांना जातीयता संपवायची नाही, तर जातीयतेवर मोहोर

पोशिंद्यांची लोकशाही / २४५