पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भरभक्कम होती असे नाही. ४० वर्षे विरोधात काम करून शेवटी पक्षाला सत्तेकडे नेणारे आणि पंतप्रधान बनणारे नेते म्हणून त्यांचे तेजोवलय होते. वाजपेयींच्या या स्थितीची राजीव गांधी पंतप्रधान बनले त्यावेळच्या परिस्थितीशी तुलना मोठी उद्बोधक ठरेल. इंदिरा गांधींच्या अपमृत्युमुळे आलेली सहानुभूतीची लाट, वारसा हक्काने मिळालेले पंतप्रधानपद, निवडणुकीत मिळालेले 'न भूतो न भविष्यति' असे यश, तरुण वय, उत्तम आरोग्य ही सगळी बलस्थाने असूनही, देशाला २१ व्या शतकाकडे नेण्याची 'केनेडी छान' घोषणा करूनही, सॅम पित्रोदा, मणीशंकर अय्यर, यांच्यासारखे सहकारी मिळूनही राजीव गांधींनी पाच वर्षात सत्ता गमावली. याउलट परिस्थितीत वाजपेयींनी कामाला सुरुवात केली. भाजपाला बहुमत नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणून त्यांची आघाडी बांधावी लागली. ही आघाडी बांधताना पक्षातील कडव्या हिंदुत्ववाद्यांना, स्वदेशीवाल्यांना वेसण घालून राममंदिर, घटनेतील कलम ३७० व समान नागरी कायदा या भाजपाच्या इभ्रतीच्या मुद्द्यांवरहही तडजोड करावी लागली. वाजपेयींनी एक आघाडी बनवून दुष्कर आर्थिक परिस्थिती, पाकिस्तानचे कारगिलमधील आक्रमण, आघाडीतील बारक्यामोठ्या कुरबुरी या सगळ्यांना तोंड देत कारभार सांभाळला आणि १३ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण केला. सहा वर्षांनी आलेल्या या निवडणुकीत 'वाजपेयींना पर्याय नाही' अशी सर्वदूर भावना असावी, यातच वाजपेयी यांचे यश आहे.
 आघाड्यांच्या शासनांच्या काळात संकुचित विषयपत्रिकेचे सरकार टिकू शकत नाही हे वाजपेयींनी अचूक हेरले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसप्रमाणे सर्वसमावेशक बनवले. त्यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीत जॉर्ज फर्नाडिस यांच्यासारखे मजूर नेते, रामविलास पासवानसारखे दलित नेते, बाळासाहेब ठाकऱ्यांसारखे कट्टर हिंदुत्ववादी एकजुटीने काम करत राहिले. जयललिता, ममता यांनी काही थोडा त्रास दिला, नाही असे नाही. पण, येत्या निवडणुकीत या दोघीही आधी विरोधात जाऊन, पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला साथ देत आहेत. येत्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले, तरीही सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच असेल, हे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. उलटपक्षी, काँग्रेसप्रणीत आघाडीत आघाडी जिंकली तर - जमले तर सरकार निव्वळ काँग्रेसचेच, नाही जमले तर काँग्रेसप्रणीत आघाडीचे; काँग्रेसची एकपक्षीय सत्ता आली, तर सोनियाजी पंतप्रधान, ते नच झाल्यास आघाडीतील सदस्यांनी नव्या पंतप्रधानाचा निर्णय करायचा अशी

पोशिंद्यांची लोकशाही / २४४